काहीतरी मोठं घडणार? जम्मू काश्मीरमध्ये रातोरात लष्कराची मोठी कुमक तैनात; अमित शाह यांच्या बैठकीनंतर हालचालींना वेग

Jammu Kashmir News : जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या हालचालींचे संकेत... पुढील काही तासांत नेमकं काय घडणार? जाणून घ्या महत्त्वाची बातमी...   

सायली पाटील | Updated: Jul 20, 2024, 12:34 PM IST
काहीतरी मोठं घडणार? जम्मू काश्मीरमध्ये रातोरात लष्कराची मोठी कुमक तैनात; अमित शाह यांच्या बैठकीनंतर हालचालींना वेग  title=
Jammu kashmir terrorist attack after Amit shah meeting major army soldiers and artillery deployed in doda punch

Jammu Kashmir News : जम्मू काश्मीर भागामध्ये कमी झालेल्या दहशतवादानं मागील काही महिन्यांपासून पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरुवात केली. ज्या भागाला दहशतवादमुक्त म्हणून घोषित करण्यात आलं होतं त्याच भागानं सध्या असे काही दहशतवादी हल्ले पाहिले, की इथं स्थानिकांवर जीव मुठीत घेऊन वावरण्याची वेळ आली आहे. 

देशातील वाढत्या दहशतवादी कारवायांचं हे सावट गडद होत असल्याचं पाहता केंद्र सरकारनं काही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि लष्करानं रातोरात संपूर्ण मोर्चा देशाच्या अतीव उत्तरेकडे असणाऱ्या या भागाच्या दिशेनं वळवला असून, इथं सध्याच्या घडीला तब्बल लष्कराच्या 3000 जवानांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे. 

अमित शाह यांच्यासोबतची बैठक आणि त्यानंतरच्या हालचाली... 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी घेतलेल्या उच्चस्तरिय बैठकीनंतर जम्मू काश्मीरमध्ये ही सूत्र हलण्यास सुरुवात झाली आणि रातोरात लष्कराची मोठी कुमक इथं तैनात करण्यात आली. फार काळानंतर या भागामध्ये लष्कराच्या एकंदर हालचाली आणि सशस्त्र सैनिक तैनात झाल्याचं पाहता येत्या काळात भारतीय लष्कर एखाद्या मोठ्या कारवाईच्या दृष्टीनं पावलं उचलू शकते असं संरक्षण क्षेत्रातील जाणकारांचं म्हणणं आहे.

हेसुद्धा वाचा : फौजदारी कायदे बदलण्याची काय गरज होती? कोर्टाचा मोदी सरकारला सवाल; कानउघाडणी करत म्हणाले, 'विधी आयोगाचे...'

 

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमध्ये 3000 अतिरिक्त सशस्त्र सैनिक तैनात करण्यात आले असून यामध्ये 500 पॅरा कमांडोंचाही समावेश आहे. सीआरपीएफचाही या तुकडीमध्ये समावेश असून, सीमेनजीकच्या हालचालींना आता प्रचंड वेग मिळताना दिसत आहे. 

सध्याची परिस्थिती पाहता याआधी अनुच्छेद 370 रद्द करण्यासाठीच्या हालचाली केंद्राकडून सुरू झाल्या त्यावेळी काश्मीरच्या खोऱ्यामध्ये असाच काहीसा लष्कराचा फौजफटा वाढवण्यात आला होता. आता पुन्हा एकदा काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांमुळं तणावाची परिस्थिती निर्माण झालेली असताना त्याच धर्तीवर इथं लष्कराची उपस्थिती लक्ष वेधून जात आहे. पुँछ, कठुआ, डोडा अशा भागांमध्ये लष्कराचे अनेक जवान तैनात असून, या सर्व भागांमध्ये शोधमोहिम हाती घेतल्याचं पाहायला मिळत आहे.