बांदीपोरा : जम्मू आणि काश्मीर परिसरात गेल्या काही दिवसांपासून होणारी बर्फवृष्टी पाहता त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. याचा फटका स्थानिकांना बसत असून, परिस्थितीशी सामना करण्यासाठी त्यांना मदत होतेय ती म्हणजे भारतीय भूदलाची अर्थात भारतीय सैन्यदल अधिकाऱ्यांची. रविवारी भारतीय सैन्यदलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ८ फेब्रुवारीला बांदीपोरा जिल्ह्यात त्यांनी एका गर्भवती महिलेची मदत केली असून, त्या महिलेने सुरक्षितपणे जोन जुळ्या मुलींना जन्म दिला आहे.
शुक्रवारी म्हणजेच ८ फेब्रुवारीला बांदीपोरा येथील सैन्यदलाच्या पनार कॅम्पमध्ये मदत मागण्यासाठी म्हणून एका गावकऱ्याने संपर्क केला. त्याच्या गर्भवती पत्नीला तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज असल्या कारणाने त्याने सैन्यदलाकडे मदतीसाठी धाव घेतली. मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत असल्यामुळे संबंधित महिलेच्या घरापर्यंत पोहोचणाऱ्या रस्त्यावर वाहनांची ये-जाही पूर्णपणे अशक्य होती.
महिलेची स्थिती पाहता बांदीपोरा राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न करता वाहनं न जाऊ शकणाऱ्या त्या वाटेवरुन स्ट्रेचरच्या सहाय्याने जवळपास अडीच किलोमीटरची वाट चालत, गुडघ्यापर्यंतच्या बर्फातून वाट काढत महिलेल्या रुग्णालयात नेण्यासाठी पावलं उचलली.
सैन्यदलाच्या रुग्णवाहिकेतूनच त्या गुलशना बेगम यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. वेळेचं महत्त्वं पाहता रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सैन्यदलाकडून संबंधित रुग्णालयात सर्व व्यवस्था करण्यात आली होती. पण, तपासणीनंतर महिला जुळ्या मुलांना जन्म देणार असल्यामुळे तिला सिझर करण्याची गरज असल्यामुळे पुढे लगेचच श्रीनगर येथील रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे त्या महिनेने जुळ्या मुलींना जन्म दिला.
अतिशय बिकट परिस्थितीच्या वेळी त्या महिलेच्या मदतीला धावलेल्या सैन्यदल अधिकाऱ्यांचं आणि संपूर्ण सैन्यदलाचं सध्या सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. एका अर्थी ते सैन्यदल अधिकारी त्या महिलेसाठी कोणा एका देवदूताहून कमी नव्हते अशी प्रतिक्रियाही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी दिली आहे.