Sopore Terror Attack : पाहा बिथरलेल्या 'त्या' चिमुरड्याची जवानांनी अशी काढली समजूत

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर स्थानिक   

Updated: Jul 1, 2020, 12:38 PM IST
Sopore Terror Attack : पाहा बिथरलेल्या 'त्या' चिमुरड्याची जवानांनी  अशी काढली समजूत  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

श्रीनगर : बुधवारी सकाळी जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. गस्त घालणाऱ्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर त्यांनी स्थानिकांनाही निशाणा बनवण्यास सुरुवात केली. या साऱ्यामध्ये घटनास्थळीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी, जवान हे त्या मुलाची समजूत काढताना दिसत आहेत. 

 'आम्ही तुझ्यासाठी बिस्कीट आणि चॉकलेट आणले आहेत....', असं म्हणत त्याची समजूत काढताना दिसत आहेत. 

वडिलांच्या मृतदेहावर बसलेला तो मुलगा... 

'एएनआय'वर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओसोबतच एक फोटोही बराच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हा मुलगा त्याच्या वडिलांच्या मृतदेहावर खेळताना दिसला होता. हा फोटो घटनास्थळावरीलच असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये एका जवानानं या मुलाला सुरक्षित स्थळी नेल्याचा फोटोही व्हायरल झाला. मुख्य म्हणजे व्हायरल होणाऱ्या या फोटोंमध्ये दिसणाऱ्या मुलाला त्या ठिकाणी नेमकं काय सुरु आहे, याची कल्पनाही नसावी. 

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर स्थानिक 

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील महिन्याभरामध्ये सुरक्षा दलाकडून करण्यात आलेल्या कारवाईत जवळपास ३० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दलांच्या या कारवाईमुळं दहशतवाद्यांनी आता स्थानिकांना निशाण्यावर घेण्यास सुरुवात केली आहे.