'जैश-ए-मोहम्मद'चा टॉप कमांडर अबू खालिद याचा खात्मा

उत्तर काश्मीरच्या लादूरा परिसरात 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या टॉप कमांडरचा भारतीय सैन्याने खात्मा केला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 9, 2017, 04:15 PM IST
'जैश-ए-मोहम्मद'चा टॉप कमांडर अबू खालिद याचा खात्मा  title=
Image: ANI

नवी दिल्ली : उत्तर काश्मीरच्या लादूरा परिसरात 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या टॉप कमांडरचा भारतीय सैन्याने खात्मा केला आहे.

'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर अबू खालिद याला कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे. या संदर्भातली माहिती जम्म्-काश्मीरचे पोलीस महासंचालक एसपी वैद यांनी दिली आहे.

एसपी वैद यांनी सांगितले की, अबू खालिद याचा खात्मा हे सुरक्षा दलाचं एक मोठं यश आहे. अबू खालिद हा जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता. तो खासकरुन पोलिसांना आपलं टार्गेट करत असे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष मोहीमेत स्थानिक पोलीस, सीआरपीएफ आणि भारतीय सैन्य दलाने केलेल्या कारवाईत अबू खालिद मारला गेला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू खालिद हा एक पाकिस्तानी नागरिक होता आणि तो गेल्या दोन-तीन वर्षांपासून जम्मू-काश्मीर परिसरात सक्रीय होता. तसेच तो दहशतवादी संघटनेत युवकांची नियुक्ती करण्यातही सक्रीय होता.

मॉस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत अबू खालिद याचा समावेश होता. त्याच्यावर सात लाख रुपयांचं बक्षीसही ठेवण्यात आलं होतं. लादूरा परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने परिसराला घेरलं आणि तपासणी सुरु केली. या दरम्यान झालेल्या गोळीबारात जैश-ए- मोहम्मदचा कमांडर अबू खालिद याचा मृत्यू झाला.