Pulwama Attack : 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्याला अटक

सज्जाद खानचा एक भाऊ अजहर मसूदसह चकमकीत मारला गेला होता.

Updated: Mar 22, 2019, 12:51 PM IST
Pulwama Attack : 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्याला अटक title=

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यातील जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरला पकडण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून लाल किल्ल्याजवळ जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला गुरूवारी अटक करण्यात आली आहे. सज्जाद खान असे या दहशतवाद्याचे नाव असल्याची माहिती मिळत आहे. सज्जाद खान 14 फेब्रुवारी रोजी पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड मुद्दसर याचा खास असल्याचे समजते आहे. सज्जाद खान जम्मू काश्मीरमधील त्राल येथील रहिवासी आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी दहशतवादी सज्जादची कसून चौकशी करत आहेत. सज्जाद खानला झालेली अटक हे सुरक्षा दलांसाठी मोठे यश मानले जात आहे.

साजिद उर्फ सज्जाद खानचा एक भाऊ अजहर मसूदसह चकमकीत मारला गेला. दूसरा भाऊदेखील एका चकमकीत मारला गेला. सज्जाद गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत शॉल विक्रेता बनून राहत होता. सज्जाद खान भारतात पुन्हा एकदा एखादा मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.