भोपाळ : मध्यप्रदेशच्या नीमच जिल्ह्यात राहणाऱ्या एका जोडप्यानं आपली १०० करोड रुपयांच्या संपत्तीवर पाणी सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय. महत्त्वाचं म्हणजे, या जोडप्याला तीन वर्षांची एक मुलगीही आहे.
'हिंदुस्तान टाईम्स'नं दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय सुमित राठोड आणि त्यांची पत्नी २४ वर्षीय अनामिका २३ सप्टेंबर रोजी गुजराच्या सुरतमध्ये दीक्षा घेणार आहेत. आचार्य रामलाल महाराच त्यांना दीक्षा देणार आहेत.
अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला मागे ठेऊन दीक्षा घेण्याच्या राठोड दांम्पत्याच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. व्यापारात आणि व्यवसायात यशस्वी असतानाही सुमित आणि अनामिका यांनी संन्यास घेण्याचा निर्णय का घेतलाय? असा प्रश्न त्यांना पडलाय.
अनामिकाचे वडील अशोक यांना मात्र याचं फार आश्चर्य वाटलेलं नाही... मुलगी आणि जावयानं संन्यास घेतल्यानंतर त्यांच्या मुलीची जबाबदारी आपण घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. आपला धार्मिक निर्णय घेण्यासाठी कुणीही स्वतंत्र असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलीय.