नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने आपल्या संशोधनात भरारी घेत आणखी एक पाऊल पुढे टाकलंय. भारतीय शास्त्रज्ञांनी अवकाशात आणखी एका ऐतिहासिक क्षणाची नोंद केलीय. सर्वाधिक सशक्त अशा जीसॅट-३० या उपग्रहानं अवकाशात यशस्वी झेप घेतलीय. युरोपीय एरियन-५ या यानाच्या साथीने जीसॅट-३० चे उड्डाण यशस्वी करून दाखवण्यात भारतीय शास्त्रज्ञांना अखेर यश आलंय. भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री २ वाजून ३५ मिनिटांनी जीसॅट ३० उपग्रहाने एरियन ५ च्या साथीने अंतराळात झेप घेतली आणि शास्त्रज्ञांचे चेहरे खुलले. जीसॅट ३० इन्सॅट ४ एची जागा घेईल आणि अधिक क्षमतेने काम करेल. इन्सॅट ४ ए २००५ साली लॉन्च करण्यात आला होता. जीसॅट ३० मुळे इंटरनेट क्षेत्रात मोठी क्रांती होण्याची शक्यता आहे.
#Ariane5 Flight #VA251 carrying #GSAT30 and EUTELSAT KONNECT successfully liftoff pic.twitter.com/PLRiMgidPw
— ISRO (@isro) January 16, 2020
जियोसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये यशस्वीरित्या लॉन्च झालं. याचसोबत भारतानं यंदाचं अर्थात २०२० मधलं पहिलं मिशन यशस्वीरित्या पार पाडलंय. हा उपग्रह टेलिकम्युनिकेशन सेवा सुधारण्यासाठी मदत करणार आहे.
या उपग्रहाचं वजन जवळपास ३१०० किलो आहे. लॉन्चिंगनंतर १५ वर्षांपर्यंत हा उपग्रह काम करू शकेल. यामध्ये दोन सोलर पॅनल आणि बॅटरी आहे त्यामुळे हा काम करू शकेल.
व्ही सॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाईट बातम्या संग्रहण, डीटीएच टेलिव्हिजन अशा अनेक कारणांसाठी या उपग्रहागचा व्यापक वापर केला जाऊ शकेल.