'या' लोकांना रेल्वेच्या भाड्यात मिळते सवलत; विद्यार्थी, तरुण आणि शेतकरी यांचाही यादीत समावेश

रेल्वेकडून अनेक वर्गातील लोकांना भाड्यात सवलत दिली जाते. 

Updated: Dec 7, 2021, 07:13 PM IST
'या' लोकांना रेल्वेच्या भाड्यात मिळते सवलत; विद्यार्थी, तरुण आणि शेतकरी यांचाही यादीत समावेश title=

मुंबई : भारतीय रेल्वे सर्व श्रेणीतील प्रवाशांना सहज प्रवास करण्याचा अनुभव देते. इतकेच नाही तर असे अनेक लोकं किंवा श्रेणीतील लोकं आहेत, ज्यांना रेल्वेकडून भाड्यात सवलतही देण्यात येते. वास्तविक, रेल्वेकडून अनेक वर्गातील लोकांना भाड्यात सवलत दिली जाते. आज आम्‍ही तुम्‍हाला अशा श्रेणींबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये येणाऱ्या लोकांना रेल्वेकडून सवलत मिळत आहे. याद्वारे तुम्हाला हे देखील कळू शकेल की, तुम्ही नक्की कोणत्या श्रेणीमध्ये बसता, ज्यामुळे तुम्हाला सूट मिळवण्यासाठी मदत होते.

रुग्ण - उपचारासाठी जाणारे कर्करोग रुग्ण आणि परिचर यांना द्वितीय श्रेणी, प्रथम श्रेणी, चेअर कार, स्लीपरमध्ये 100% आणि 3 एसी, फर्स्ट एसी आणि सेकंड एसीमध्ये 50% सवलत मिळते. त्याच वेळी, थॅलेसेमिया रुग्णांना द्वितीय श्रेणी, स्लीपर, प्रथम श्रेणी, 3 एसी, चेअर कार, फर्स्ट एसी आणि सेकंड एसीमध्ये 50% सवलत मिळते.

याशिवाय हृदय शस्त्रक्रिया, डायलिसिस, हिमोफिलिया, टीबीच्या रुग्णांना द्वितीय श्रेणी, स्लीपर, प्रथम श्रेणी, 3 एसी, चेअर कारमध्ये 75% सूट मिळते. याशिवाय एड्स, कुष्ठरोग, ऑस्टोमी, सिकलसेल अॅनिमिया रुग्णांनाही ५०% सूट मिळते.

ज्येष्ठ नागरिक- 60 वर्षांवरील सर्व पुरुष आणि 58 वर्षावरील महिलांना सर्व श्रेणींमध्ये 40% सूट मिळते. तसेच या सवलती राजधानी, शताब्दी, दुरांतो वाहनांसाठीही लागू आहेत.

शहीदांच्या विधवा- युद्ध शहीदांच्या विधवा बायका, दहशतवादी आणि अतिरेक्यांविरुद्धच्या कारवाईत शहीद झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांच्या विधवा बायका आणि निमलष्करी कर्मचार्‍यांच्या विधवा बायका, दहशतवादी आणि अतिरेक्यांविरुद्धच्या कारवाईत शहीद झालेले पोलीस कर्मचारी आणि निमलष्करी कर्मचार्‍यांच्या विधवा, तसेच श्रीलंकेतील कारवाईत शहीद झालेल्या IPKF जवानांच्या विधवा, दहशतवादी आणि अतिरेक्यांविरुद्धच्या कारवाईत शहीद झालेल्या लष्करी जवानांच्या विधवा आणि 1999 मध्ये कारगिलमधील ऑपरेशन विजयमध्ये शहीद झालेल्यांच्या विधवांना द्वितीय श्रेणी आणि स्लीपर श्रेणीमध्ये 75% सूट मिळते.

युवा वर्ग- राष्ट्रीय युवा प्रकल्प, मानव उत्थान सेवा समिती शिबिरात सहभागी होणार्‍या युवकांना द्वितीय श्रेणी आणि स्लीपर श्रेणीतील 50% सुट, तर सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीच्या मुलाखतीसाठी जाणारे बेरोजगार युवकांना द्वितीय श्रेणी आणि स्लीपर श्रेणीतीत 50% सवलत उपलब्ध आहे. याशिवाय भारत स्काऊट्स आणि गाईड्सच्या तरुणांना स्काउटिंग ड्युटीसाठी द्वितीय श्रेणी आणि स्लीपर क्लासमध्ये 50% सवलत मिळते.

शेतकरी - कृषी/औद्योगिक प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी शेतकरी आणि औद्योगिक कामगारांसाठी द्वितीय श्रेणी आणि स्लीपर वर्गात 25%, तर सरकारने प्रायोजित केलेल्या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 33%, चांगल्या शेती/दुग्ध अभ्यासासाठी/शेतकरी आणि दूध उत्पादकांना प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील संस्थांना भेट दिल्यास द्वितीय श्रेणी आणि स्लीपर क्लासमध्ये 50% सवलत रेल्वेकडून मिळत आहे.