गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ८६९६१ नवे रुग्ण; ११३० जणांचा मृत्यू

आतापर्यंत एकूण ८७, ८२२ लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. 

Updated: Sep 21, 2020, 10:54 AM IST
गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ८६९६१ नवे रुग्ण; ११३० जणांचा मृत्यू title=

नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ८६९६१ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर उपचार सुरु असलेल्या ११३० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५४,८७,५८१ वर जाऊन पोहोचला. यापैकी १०,०३,२९९ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर देशातील ४३,९६,३९९ लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत एकूण ८७, ८२२ लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

राज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले, तर ४५५ रुग्णांचा मृत्यू

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा मृत्यूदर कमी असल्याचा दावा केला होता. तसेच पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत कोरोनावर देशी लस उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. परंतु, गेल्या काही दिवसांत देशात दररोज ९० हजाराहून नव्या रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मात्र, समाधानाची बाब हीच की, भारतात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही जास्त आहे. भारताने नुकतेच रिकव्हरी रेटमध्ये अमेरिकेलाही मागे टाकले होते. भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर अमेरिकेपेक्षाही अधिक झाला आहे. त्यामुळे कोरोना रिकव्हरी रेटमध्ये भारत अव्वल स्थानी आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. राज्यात रविवारी कोरोनाच्या २०,५९८ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर ४५५ जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात रुग्णांचं बरे होण्याचे प्रमाण ७३.१७ टक्के आहे. आतापर्यंत राज्यात ८,८४,३४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.