IRCTC Tour Package: वैष्णोदेवीला जाण्यासाठी रेल्वेची खास सवलत; खाणं, राहणं मोफत

जाणून घ्या संपूर्ण प्लॅन आणि आखा सुट्टीचा बेत....   

Updated: Oct 16, 2021, 01:32 PM IST
IRCTC Tour Package: वैष्णोदेवीला जाण्यासाठी रेल्वेची खास सवलत; खाणं, राहणं मोफत title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : IRCTC Tour Package: कायमच प्रवाशांच्या हिताचा विचार करत त्यांच्या खिशाला परवडेल अशा खास पॅकेजची घोषणा भारतीय रेल्वेनं केली आहे. तुम्हीही माता वैष्णो देवीची यात्रा करण्यासाठी इच्छुक असाल तर, रेल्वेकडून ही सुवर्णसंधी देण्यात आली आहे. 

आयआरसीटीसीकडून यावेळी वैष्णोदेवी धाम (Vaishno devi tour package) साठी तीन रात्री आणि चार दिवसांच्या टूर पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. जवळपास 5200 फूट उंचीवर असणाऱं हे मंदिर कटरापासून 12 किमी अंतरावर आहे. जिथं जाण्यासाठी भारतीय रेल्वेनं एक खास पॅकेज तयार केलं आहे. 

आयआरसीटीसीनं अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या पॅकेजची घोषणा केली आहे. ज्याची सुरुवात प्रती व्यक्ती 5795 रुपयांपासून होणार आहे. दिल्लीपासून या यात्रेची सुरुवात होणार आहे. नवी दिल्ली- जम्मू- कटरा- बाणगंगा- कटरा- जम्मू- नवी दिल्ली अशी या कार्यक्रमाची रुपरेषा असणार आहे. 

पहिल्या दिवशी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून 20.40 मिनिटांनी हा प्रवास सुरु होईल. यामध्ये 3 टियर सुविधा मिळेल. दुसऱ्या दिवशी 5 वाजता जम्मूला पोहोचल्यानंतर विना एसी वाहनानं कटरापर्यंतचा प्रवास सुरु होईल. यानंतर यात्रेकरुंना सरस्वती धाम येथे थांबावं लागेल. यानंतर बाणगंगापर्यंत नाश्ता आणि ड्रॉप दिला जाईल. पुढे मंदिरात दर्शन झाल्यानंतर रात्री हॉटेलमध्ये वास्तव्य आणि जेवणाची सोय असेल. 

तिसऱ्य़ा दिवशी न्हाहारीनंतर तुम्ही फिरण्यासाठी बाहेर जाऊ शकता. दुपारी 12 नंतर हॉटेलमधून निघताच तुम्हाला दुपारचं जेवण दिलं जाईल. ज्यानंतर पुन्हा विना एसी वाहनानं जम्मू स्थानकापर्य़ंतचा प्रवास सुरु होईल. कांड कंडोली मंदिर, रघुनाथजी मंदिर येथे भेट दिली जाईल. यापुढे परतीचा प्रवास नवी दिल्ली स्थानकात येऊन संपेल. या पॅकेजची सर्व सविस्तर माहिती आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.