VIDEO : हामीदची आई म्हणते, 'मेरा भारत महान; मेरी मॅडम महान'

तो मायदेशी परतला तेव्हा त्याच्या कुटुंबीयांच्या भावनांचा बांध फुटला. 

Updated: Dec 19, 2018, 01:38 PM IST
VIDEO : हामीदची आई म्हणते, 'मेरा भारत महान; मेरी मॅडम महान' title=

मुंबई : पाकिस्तानच्या कारागृहातून सुटका झाल्यानंतर मुळचा मुंबई, वर्सोवाचा असणारा हामीद अन्सारी मंगळवारी भारतात परतला. वाघा बॉर्डर येथून तो भारतात आला. जवळपास सहा वर्षांनंतर अनेकांच्याच प्रयत्नांनंतर हामीदला भारतात परत आणण्यात यश मिळालं आहे. तो मायदेशी परतला तेव्हा त्याच्या कुटुंबीयांच्या भावनांचा बांध फुटला. 

संपूर्ण देशाकडून हामीदचं स्वागत करण्यात आलं. ज्यानंतर त्याने दिल्लीत जाऊन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. यावेळी हामीदचे कुटुंबीयही त्याच्यासोबत उपस्थित होते. स्वराज यांचे मनापासून आभार मानताना त्यालाही अश्रू अनावर झाले. तर त्याच्या आईनेही स्वराज यांना मिठी मारत त्यांच्या योगदानासाठी आणि मदतीसाठी मन:पूर्वक आभार मानले. 

'मेरा भारत महान, मेरी मॅडम महान... सब मॅडमनेही किया है....', असं म्हणत हामीदच्या आईने भावनांना वाट मोकळी करुन दिली. 'हा वाईट वेळ होता, जो आता सरला आहे', असं म्हणत स्वराज यांनी हामीदच्या आईची आणि कुटुंबीयांची समजूत काढली. एएनआय या वृत्तसंस्थेने या प्रसंगाचा व्हिडिओ आणि काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

स्वराज यांच्या कानांवर जेव्हा हामीदचं प्रकरण पडलं तेव्हा त्यांनी पाकिस्तानच्या प्रशासनापुढे हा मुद्दा उचलून धरला. बऱ्याच प्रयत्नांनतर अनेकांच्याच योगदानामुळे हामीदला मायदेशी परत आणण्यात यश आलं. 

...म्हणून हामीद पाकिस्तानात गेला होता

मुळचा वर्सोवा येथील असणारा हामीद अन्सारी जवळपास सहा वर्षांनंतर मायदेशी परतला आहे. बनावट पाकिस्तानी ओळखपत्र बाळगल्याच्या आरोपावरुन त्याला पाकिस्तान लष्करी न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावली होती. खरंतर एका पश्तून मुलीच्या प्रेमाखातर हामीदने थेट देशाची सीमा ओलांडली होती. पण, त्याच्या आयुष्यात असं वळण आलं की त्याला सीमेपलीकडेच कारावास भोगावा लागला होता.