'लक्ष ठेवा, विनाकारण...', भारताने 'या' देशातील नागरिकांना दिला सुरक्षेचा इशारा

इस्त्रायलने पॅलेस्टाईनविरोधात युद्ध पुकारलं असल्याने भारताने तेथील नागरिकांना इशारा दिला आहे. भारतीय नागरिकांनी सुरक्षेच्या नियमांचं पालन करावं असं सरकारने निवेदनात सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 7, 2023, 04:32 PM IST
'लक्ष ठेवा, विनाकारण...', भारताने 'या' देशातील नागरिकांना दिला सुरक्षेचा इशारा title=

इस्त्रायलने पॅलेस्टाइनविरोधात युद्धाची घोषणा केली आहे. पॅलेस्टाईनमधील हमासच्या दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ला केल्यानंतर आणि देशात घुसखोरी केल्यानंतर इस्त्रायलने देश युद्धाच्या स्थितीत असल्याचं जाहीर केलं आहे. हमास दहशतवाद्यांनी गाझा पट्टीवरुन इस्त्रायलवरुन रॉकेट्स डागले. रॉकेट्स हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून, दोन जखमी झाले आहेत. यानंतर इस्त्रायलमधील भारतीय दुतावासाने तेथील भारतीय नागरिकांना इशारा दिला आहे. दुतावासाने भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचा तसंच सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन करण्याची सूचना केली आहे. 

भारतीय दुतावासाने निवेदनात सांगितलं आहे की, "इस्त्रायलमधील सद्याची स्थिती पाहता सर्व भारतीय नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी सतर्क राहावं आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सल्ल्यांनुसार सुरक्षेच्या नियमांचं पालन करावं. काळजी घ्या आणि विनाकारण हालचाली, प्रवास करणं टाळाला. सुरक्षा छावण्यांच्या जवळच थांबा". काही गरज असल्यास दुतावासामधील प्रशासनाशी संपर्क साधा असं आवाहनही करण्यात आलं आहे. 

  ...अन् देशभरात सायरन वाजू लागले; इस्रायलकडून युद्धाची घोषणा, पॅलेस्टाईनकडून रॉकेट्सचा वर्षाव

 

हमासने गाझा पट्टीवरुन इस्त्रायलवर गेल्या काही वर्षातील सर्वात मोठा हल्ला केला आहे. हमासने जवळपास 5000 रॉकेट्स इस्त्रायलवर डागले आहेत. याशिवाय अनेक सशस्त्र दहशतवाद्यांनी सीमा ओलांडत इस्त्रायलमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर इस्त्रायलने युद्धाची घोषणा केली आहे. 

परिस्थिती चिघळत असताना, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून निवेदन जारी केलं आहे. "आपण युद्धात आहोत आणि आपण जिंकू," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. "आमच्या शत्रूला अशी किंमत मोजावी लागेल ज्याची त्यांनी कधीच कल्पना केली नसेल," असे नेतान्याहू म्हणाले आहेत.

इस्रायल सैन्याने हमासच्या अतिरेक्यांविरुद्ध 'ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स' घोषित केलं आहे. हवाई दलाने गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासला लक्ष्य करण्यासाठी लढाऊ विमानांनी हल्ला केला आहे. इस्रायली लष्कर आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये सध्या जोरदार चकमक सुरू आहे.