वॉशिंग्टन : कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे संपूर्ण जगाला आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे, यात भारतालाही मोठी झळ लागली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला चालू आर्थिक वर्षात प्रचंड मंदीतून जावं लागू शकत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) बुधवारी, 2020 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 4.5 टक्क्यांनी घसरु शकेल आणि ही ऐतिहासिक घसरण असेल, अशी शक्यता वर्तवली आहे.
IMFनुसार, कोरोना व्हायरस आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांमुळे बहुतेक आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था खाली येण्याची शक्यता आहे. दरम्यान, IMFच्या अंदाजानुसार, 2021 मध्ये भारत देश पुन्हा वेगवान मार्गावर परत येईल आणि त्यावर्षी 6.0 टक्क्यांनी मोठी आर्थिक वाढ होईल.
आयएमएफने 2020 मध्ये जागतिक वाढीच्या तुलनेत 4.9 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. एप्रिल 2020 मध्ये जाहीर झालेल्या जागतिक आर्थिक अंदाजानुसार हा 1.9 टक्क्यांनी खाली आहे.
नाणेनिधीचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ, भारतीय-अमेरिकन गीता गोपीनाथ, यांनी 'या भयंकर संकटाकडे पाहता आमचा अंदाज आहे की 2020 मध्ये अर्थव्यवस्था 4.5 टक्क्यांनी घसरेल. हा अंदाज ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय खाली आहे. बहुतेक सर्व देशांमध्ये हीच परिस्थिती आहे, असं त्यांनी सांगितलं.
अहवालात, कोरोना व्हायरसच्या 2020 च्या पहिल्या सहामाहीत होणारे नकारात्मक परिणाम अपेक्षेपेक्षा जास्त व्यापक आहेत, असं सांगण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेत घसरण होण्याचं कारण सांगण्यात येत आहे.