नवी दिल्ली: भारतीय नागरिकांना नेहमीच लष्कराविषयी खास आपुलकी आणि उत्सुकता राहिली आहे. त्यामुळेच भारतीय सैन्याचे अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिक नेहमीच गर्दी करतात. यापैकी एक म्हणजे राजपथावरील प्रजासत्ताक दिनाचा सोहळा. मात्र, प्रजासत्ताक दिनाच्या या उत्सवाचा सांगता समारोह म्हणून ओळखला जाणारा 'बीटिंग द रिट्रीट' चा नयनरम्य सोहळ्याविषयी लोकांना तितकीशी माहिती नसेल. परंतु, यंदा एका अनोख्या कारणामुळे या सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. आतापर्यंत या सोहळ्यात सैन्याच्या बँडकडून ब्रिटीशकालीन पाश्चात्य सुरावटी वाजवल्या जात असत. मात्र, यंदा पहिल्यांदाच हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. यंदाच्या सोहळ्यात सैन्याचे विविध बँडस एकूण २७ सुरावटी वाजवतील, यापैकी १९ सुरावटी भारतीय कलाकारांनी तयार केल्या आहेत. या कार्यक्रमात पायदळ, नौदल, वायूदल, राज्य व केंद्रीय सशस्त्र दल अशा विविध बँडसनी दिमाखदार सादरीकरण केले. यावेळी वाजवण्यात आलेल्या १९ सुरावटींमध्ये 'इंडियन स्टार', 'पहाडो की रानी', 'कुमाओनी गीत', 'जय जन्मभूमी', 'क्वीन ऑफ सातपुडा', 'मरुनी', 'विजय', 'सोल्जर माय व्हेलेंटाईन', 'भुपाळ', 'विजय भारत', 'आकाश गंगा', 'गंगोत्री', 'नमस्ते इंडिया', 'समुद्रिका', 'जय भारत', 'यंग इंडिया', 'वीरता की मिसाल', 'अमर सेनानी', 'भूमिपूत्र' यांचा समावेश होता. तर उर्वरित आठ पाश्चिमात्य सुरावटींमध्ये 'फॅनफेअर बाय बगलर्स', 'साऊंड बॅरिअर', 'एम्ब्लाझोनड', 'ट्विटलाईट', 'अलर्ट (पोस्ट हॉर्न गॅलोप),' 'स्पेस फ्लाईट', 'ड्रमर्स कॉल', 'अबाईड विथ मी' यांचा समावेश होता. यानंतर सारे जहाँ से अच्छा या सुरावटीने 'बीटिंग द रिट्रीट' सोहळ्याची सांगता झाली. या समारंभानंतर प्रजासत्ताक दिनासाठी दिल्लीत आलेल्या लष्कराच्या तुकड्या पुन्हा माघारी जातात.
'बीटिंग द रिट्रीट'ची परंपरा फार जुनी आहे. याचे मुळ नाव ‘वॉच सेटिंग’असून हा कार्यक्रम सुर्यास्ताच्या वेळी होतो. भारतात या सोहळ्याची सुरुवात १९५० पासून झाली. मात्र, १९५०पासून आतापर्यंत हा कार्यक्रम दोन वेळा रद्द करण्यात आला. प्रथम २६जानेवारी २००१ रोजी गुजरातमध्ये मोठा भूकंप झाला होता. त्यानंतर २७ जानेवारी २००९ रोजी जेव्हा भारताचे आठवे राष्ट्रपती वेंकटरामन यांचे निधन झाले होते. हे दोन अपवाद वगळता १९५०पासून हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी २९ जानेवारीला पार पडतो.