इथं शत्रूत्व हरलं, माणुसकी जिंकली... आणि भारतीय लष्करही

रविवारी भारतीय सैन्याने घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्याला अटक केली होती

Updated: Aug 25, 2022, 03:32 PM IST
इथं शत्रूत्व हरलं, माणुसकी जिंकली... आणि भारतीय लष्करही title=
(फोटो सौजन्य - PTI)

भारतीय लष्कर (Indian Army) जितक्या कणखरपणे देशाच्या सीमांचे रक्षण करत असते तितक्याच सहृदयीपणे सर्वांची मदतही करताना दिसते. देशातील कोणतीही आपत्ती असो भारतीय सैन्य कायमच मदतीसाठी धावून आल्याचे पाहायला मिळते. शत्रूंच्या बाबतही भारतीय सैन्याची हीच भूमिका कायम असते.

भारतीय लष्कराने एका पाकिस्तानी दहशतवाद्याचे प्राण वाचवले आहेत. जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ लष्कराच्या (Indian Army) जवानांनी रविवारी एका पाकिस्तानी घुसखोराला अटक केली होती. यावेळी त्याला गोळी लागली होती त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता.

या पाकिस्तानी दहशतवाद्याचा जीव वाचणे जवळजवळ अशक्य होते. अशा परिस्थितीत भारतीय लष्कराच्या जवानांनी आपले रक्त देऊन त्याचे प्राण वाचवले. लष्कराने सांगितले की, जवानांनी तीन बाटल्या रक्त दिल्याने त्या दहशतवाद्याचे प्राण वाचू शकले.

भारतीय लष्कराच्या जवानांनी रक्तदान करून जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात पकडलेल्या तबरिक हुसेन या पाकिस्तानी दहशतवाद्याचे प्राण वाचवले. नियंत्रण रेषेजवळ लष्कर-ए- तोयबाच्या (Lashkar-e-Taiba) तबरिक हुसेनला अटक केली होती. त्याने पाकिस्तानी (Pakistan) लष्कराच्या गुप्तचर विभागासाठीही काम केले आहे अशीही माहिती समोर आली होती.

हुसेन हा पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली जिल्ह्यातील सबझोत गावचा रहिवासी आहे. तबरिक हुसेन आत्मघाती हल्लासाठी भारतात आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्याची सखोल चौकशी करण्यात आली.
 ब्रिगेडियर राजीव नायर यांनी सांगितले की, त्याच्या मांडीला आणि दोन्ही खांद्यांना गोळी लागली होती. त्यामुळे त्याची प्रकृती अधिकच नाजूक होती. त्यानंतर सैनिकांनी तीन बाटल्या रक्त दिले आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

आम्ही उपचार करताना त दहशतवादी असल्याचा विचार केला नाही. आम्ही सर्वांवर रुग्णाप्रमाणे उपचार करतो आणि त्यांचे प्राण वाचवतो. सैनिकांनी आपले रक्त देऊन त्याचे प्राण वाचवले हे भारतीय सैन्याचे मोठेपण आहे, असेही ब्रिगेडियर नायर म्हणाले.

सध्या, त्याच्यावर लष्कराच्या वैद्यकीय सुविधेत उपचार सुरू आहेत आणि भारतीय लष्कराच्या डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवल्यानंतर त्याची प्रकृती चांगली आहे.

घुसखोरीसाठी 30 हजार रुपये

दरम्यान "पाकिस्तानी सैन्यातील कर्नल यूनुस यांच्या सांगण्यानुसार पाच लोकांनी घुसखोरी करण्याता प्रयत्न केला होता. यासाठी त्यांना 30 हजार रुपयेही देण्यात आले होते. दोन ते तीन भारतीय चौक्यांची आम्ही पाहणी केली," अशी माहिती तबरिक हुसेनने दिली आहे