नवी दिल्ली : indiavschina भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये काही दिवसांपूर्वीच लडाखमधील गलवान खोऱ्यात Galwan valley तणावाची परिस्थिती उदभवली. दोन्ही राष्ट्रांच्या लष्करामध्ये झालेली हिंसक झडप आणि त्यानंतरचे सर्व परिणाम पाहता आधीच चिंताग्रस्त वळणावर असणाऱ्या या दोन्ही देशांचं नातं आणखी बिनसलं. त्यातच सीमा वादाचा मुद्दा अद्यापही निकाली निघालेला नाही.
परिणामी सीमा भागात चीनच्या वाढत्या हालचाली, तणावाची परिस्थिती आणि लष्कराची वाढणारी कारवाई पाहता आता भारताकडून सैन्याला काही महत्त्वाचे आदेश दिले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्यदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह सैन्याच्या तिन्ही तुकड्यांच्या प्रमुखांची भेट घेतली. ज्यानंतर गरज भासल्यास सीमेवर परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराला शस्त्र वापरण्याची मुभा दिली आहे.
फक्त लष्करच नव्हे, तर ऩौदल आणि वायुदलालाही या परिस्थितीमध्ये सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असाधारण स्थितीत बंदुका वापरण्याचे आदेश देण्यासोबतच सैन्याच्या तिन्ही तुकड्यांच्या सुसज्जतेचा आढावाही घेण्यात आला. इतकंच नव्हे तर चीनसोबतच्या तणावाच्या परिस्थितीमध्ये आता हवाई दलालाही महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. हे देश म्हणजे सुट्ट्या रद्द करण्याचे. सद्यस्थितीला परिस्थितीची गरज पाहता हवाई दलातील जवानांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.
मोठी बातमी : 'त्या' संघर्षानंतर भारतील लष्कराला चीन सीमेवर गोळीबाराची मुभा
सीमा भागात शेजारी राष्ट्राकडून वाढलेली हवाई हालचाल पाहता, एलएसीवर हवाई दलाची तुकडीही मिराज 2000, सुखोई 30 अशा लढाऊ विमानांसह सज्ज असल्याची माहितीसमोर येत आहे. तर, हॅलिकॉप्टरनं पूर्वीय भागात गस्तही वाढवण्यात आली आहे. शिवाय सीमेवर ITBP सैनिकांची संख्याही वाढवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळं चीनशी असणाऱ्या या संघर्षाच्या परिस्थितीमध्ये देशाच्या संरक्षणार्थ सैन्याच्या तिन्ही तुकड्या आणि संपूर्ण सुरक्षा व्यवस्था सज्ज असल्याचं स्पष्ट होत आहे.