नवी दिल्ली : चीनी वस्तूंवर बहिष्कारासाठी आपल्या राष्ट्रीय अभियान 'भारतीय सामान - आपला अभिमान' अंतर्गत एक पाऊल पुढे टाकत कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) आज देशातील व्यापाऱ्यांना आणि लोकांना यावर्षी दिवाळी मोठ्या प्रमाणात 'भारतीय दिवाळी' या रुपात साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. सर्व भारतीयांनी या वर्षी दिवाळीमध्ये कोणत्याही चीनी वस्तू, सामानाचा उपयोग न करण्याचा संकल्प करण्याचं 'कॅट'ने सांगितलं आहे.
चीनी वस्तूंसह किंवा चीनमधील कंपन्यांनी केलेल्या करारामुळे देशातील व्यापाराला अधिक प्रदूषित करु नये यासाठी, चीन आणि चीनी वस्तूंच्या विरोधात देशातील व्यापारी मोठ्या ताकदीने पंतप्रधान मोदी आणि देशातील सैनिकांसोबत उभे असल्याचं कॅटने सांगितलं.
यावर्षी दिवाळीत आपल्या देशातील मातीपासून बनवलेले दिवे, मातीच्या मूर्ती, भारतात बनवलेले विजेचे बल्ब, दिवे, भारतात तयार झालेलं इतर सजावटीचं सामान वापरण्याचं 'कॅट'कडून सांगण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे राखी आणि जन्माष्टमी आणि इतर सणदेखील भारतीय वस्तूंचा वापर करुन केवळ भारतीय संस्कृतीनुसार साजरे केले जातील, असंही सांगण्यात आलं आहे.
तसंच व्यापाऱ्यांना 'कॅट'कडून विनंती करण्यात आली आहे की, आपला माल यापुढे चीनमधून आयात करु नये, जर कोणत्याही व्यापाऱ्यांकडे चिनी वस्तूंचा साठा असेल तर त्यांनी 15 जुलैपर्यंत हा साठा विक्री करावा, असंही सांगण्यात आलं आहे.
देशातील 7 कोटी व्यापाऱ्यांनी सरकारकडून उचलण्यात आलेल्या विविध निर्णयांचं समर्थन केलं आहे. तसंच देशातील व्यापारी पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्यासह पूर्ण क्षमतेने उभे असल्याचंही, 'कॅट'कडून सांगण्यात आलं आहे.