ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत, रुग्णालयात दाखल

Mamata Banerjee News: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तृणमुल काँग्रेसने ममता बॅनर्जी यांचे फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. ममता बॅनर्जी यांच्या कपाळाला खोप पडली असून रक्त वाहताना या फोटोत दिसतंय.

राजीव कासले | Updated: Mar 14, 2024, 09:26 PM IST
ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत, रुग्णालयात दाखल title=

Mamata Banerjee News:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तृणमुल काँग्रेसने (Trunmul Congress) ममता बॅनर्जी यांचे फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी  (Mamata Banerjee Injured) घरात असताना पडल्या. यावेळी त्यांच्या डोक्याला मार लागला. तृणमुल काँग्रेसने शेअर केलेल्या फोटोत ममता बॅनर्जी यांच्या कपाळावर खोप पडली असून त्यातून रक्त वाहाताना दिसत आहे. ममता बॅनर्जी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

ममता बॅनर्जी या घरात ट्रेडमिल वापरताना पडल्या. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. कोलकाताच्या रुग्णालयात ममता यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयातील डॉक्टर लवकरच मेडिकल बुलेटिन देण्याची शक्यता आहे. 

ममता बॅनर्जी यांच्या दुखापतीची बातमी टीएमसीने पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे. 'पक्षाच्या अध्यक्षांना गंभीर दुखापत, त्यांच्या बरं होण्यासाठी प्रार्थना करा' अशी पोस्ट या फोटोसोबत देण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर कोलकाताच्या SSKM रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

ममतांचा याआधीही अपघात
याच वर्षाच्या जानेवारी महिन्यात ममता बॅनर्जी यांच्या कारचा अपघाता झाला होता. बर्धमान इथून त्या कोलताला आपल्या कारने परतत होत्या. धुकं असल्याने ममता चालकाने कारचा ब्रेक दाबला. बेसावध असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला मार बसला. 

ममता बॅनर्जी या बर्धमान जिल्ह्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी गेल्या होत्या. हेलिकॉप्टरने त्या पुन्हा कोलकातात परतणार होत्या. पण मुसळधार पावसानमुळे त्यांनी कारने परतण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्या कारला अपघात झाला होता. 2021 मध्येही त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी बराच काळ त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा माहोल होता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये आपल्या मतदान प्रचारात व्यस्त होत्या. त्यावेळी त्यांचा अपघात झाला. यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.