संरक्षण क्षेत्रात भारताची गगनभरारी, Akash Prime ची यशस्वी चाचणी

आकाश प्राइम क्षेपणास्त्र अत्याधुनिक आणि अधिक शक्तीशाली आहे

Updated: Sep 27, 2021, 10:14 PM IST
संरक्षण क्षेत्रात भारताची गगनभरारी, Akash Prime ची यशस्वी चाचणी title=

ओडीसा : संरक्षण क्षेत्रामध्ये भारताने आणखी एक मोठा पल्ला गाठला आहे. संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (DRDO)ने शक्तिशाली आणि वेगवान हल्ला करणाऱ्या आकाश प्राइम क्षेपणास्त्राच्या (Akash Prime Missile) नव्या आवृत्तीची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र आज संध्याकाळी 4.30 वाजता ओडिसाच्या चांदीपूर (Chandipur in Odisha) इथल्या परिक्षण चाचणी केंद्रातून सोडण्यात आलं. त्याने मानवरहित हवाई लक्ष्याचा मागोवा घेतला आणि तो हवेत नष्ट केला. आकाश प्राइम आधुनिक आणि विद्यमान आकाश प्रणालीपेक्षा शक्तीशाली आहे.

आकाश प्राइम क्षेपणास्त्रात अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे जी, शत्रूला अचूक लक्ष्य करु शकते. या व्यतिरिक्त, अत्यंत उंचीवर गेल्यावर तापमान नियंत्रित केलं जातं, ग्राऊंड सिस्टममध्येही सुधारणा करण्यात आली आहे. याशिवाय रडार, ईओटीएस (EOTS) आणि टेलीमेट्री स्टेशन, क्षेपणास्त्र प्रक्षेपण आणि उड्डाण यांच्यातही अत्याधुनिकता आणण्यात आली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी (Defence Minister Rajnath Singh) DRDO, भारतीय सेना, भारतीय हवाई दल आणि संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सार्वजनिक कंपन्यांचं अभिनंदन केलं आहे. आकाश प्राइम क्षेपणास्त्रामुळे देशाची सुरक्षा आणखी वाढेल असं यावेळी ते म्हणाले. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी (G Satheesh Reddy) यांनी आकाश प्राइम क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या संघाचे अभिनंदन केलं.