India Post Offer: सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर भारतीय टपाल खात्याने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. अनेकदा सण, वाढदिवस किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी आपण एका किंवा दुसर्या शहरात राहणारे मित्र, कुटुंब आणि नातेवाईक यांना गिफ्ट पार्सल पाठवतो. पण अनेक वेळा चुकीच्या पॅकिंगमुळे माल खराब होतो. अशावेळी आपल्याला खूप वाईट वाटते. पण आता भारतीय टपाल विभागाने यासंदर्भात निर्णय घेत ग्राहकांसाठी मोठी ऑफर दिली आहे. भारतीय टपाल विभागाने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. याद्वारे बुकिंगसाठी येणाऱ्या ग्राहकांना विभागाकडून पार्सल पॅकिंगची सुविधा देण्यात येत आहे. जनरल पोस्ट ऑफिस म्हणजेच जीपीओ ऑफिसमध्ये ही व्यवस्था करण्यात आली आहे. ही सुविधा ग्राहकांच्या खूप पसंतीस पडत असून दुसरीकडे विभागाचे उत्पन्नही वाढले असल्याची माहिती टपाल खात्याच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
अद्ययावत सर्व्हिस आणि कमी वेळेत पार्सल पोहोचत असल्याने ग्राहक खासगी कुरिअर सेवेला प्राधान्य देतात. पण आता टपाल विभागानेदेखील नवनवे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. विविध जीपीओ कार्यालयात व्यवसाय पार्सल केंद्र सुरू करण्यात आले आहे. पार्सल पॅकिंगची नवीन सुविधा देणारा एक विशेष काउंटर येथे बसवण्यात आला आहे. त्या बदल्यात विभागाने नाममात्र शुल्क ठेवले आहे. लवकरच देशातील इतर जीपीओ विभागांमध्ये अशी सुविधा तुम्हाला पाहायला मिळू शकते.
पार्सलच्या खराब पॅकिंगमुळे मालाचे नुकसान झाल्याच्या अनेक वेळा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा करून पॅकिंगची सुविधा देण्याचा निर्णय घेतला. आता ग्राहकांना त्यांचे पार्सल केंद्रावर आणावे लागेल. पोस्टल कर्मचारी आयटमनुसार आवश्यक पॅकिंग करतील. बॉक्स, बबल प्लास्टिक आणि टेप वापरून पार्सल पॅक केले जाईल. त्यासाठी पॅकिंगनुसार रक्कम वसूल केली जाईल. यासाठी वस्तूनुसार वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत. ग्राहकांना पॅकिंगसाठी 100 रुपयांपर्यंत खर्च करावा लागणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
पार्सल पाठवण्यासाठी विभागाने मेल मॉनिटरिंग सिस्टीम तयार करण्यात येत आहे. ज्यामुळे पार्सलचे ठिकाण कळू शकते. दिल्ली-मुंबईसह मोठ्या शहरांमधून पार्सल मॉनिटरिंग केले जाते. यासोबतच विमानाने पार्सल पाठवण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. परंतु उड्डाणाच्या वेळेनंतर, पार्सल बुक केल्यावर विभाग ते रस्ते मार्गाने पाठविले जाते. यामुळे कनेक्टिंग फ्लाइटच्या पुढील स्टॉपवर पार्सल विमानात ठेवता येते त्यासाठी स्वतंत्र वाहन ठेवण्यात आले आहे.रक्षाबंधन-नवरात्री, दिवाळी आणि इतर सणांमध्ये पार्सल बुकिंग जास्त असते. सध्या नवरात्री-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येत असलेल्या पार्सलमुळे टपाल विभागही व्यस्त आहे. ही पार्सल विशेषतः परदेशात पाठवली जात आहेत. तेथे पार्सल पोहोचण्यासाठी सात ते आठ दिवस लागतात. विभागाने पार्सल पॅकिंगचे दरही निश्चित केले आहेत. स्पेशल काउंटर सुरु करण्यात येत आहेत.