Bandra-Worli Sea Link Toll Tax: तुम्ही वाहनांने राष्ट्रीय महामार्गावरून (National Highway) प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 1 एप्रिलपासून टोलच्या दरात (Toll Rate) वाढ होणार आहे. अशात तुम्ही मुंबईतल्या राजीव गांधी बांद्रे-वरळी सी लिंक पुलावरुन (Bandra–Worli Sea Link) प्रवास करणार असाल तर तुम्हाला आणखी भुर्दंड सहन करावा लागणार आहे. बांद्रे-वरळी सी लिंक पुलावरच्या टोल दरात तब्बल 18 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. एक एप्रिलपासून हे दर लागू होणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास निगमने याबाबतची माहिती दिली आहे.
कोणत्या वाहनाला किती दर
MSRDC दिलेल्या दरपपत्रकानुसार कार किवं जीपने प्रवास करणाऱ्यांना 100 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. तर मिनीबस आणि टेम्पो सारख्या वाहनांना 160 रुपये टोल भरावा लागणार आहे. तर ट्रकसाठी तब्बल 210 रुपये टोल आकारला जाणार आहे. आताच्या दरानुसार चारचाकी गाड्यांसाठी 85 रुपये, मिनिबससाठी 130 रुपये आणि ट्रक आणि बससाठी 175 रुपये खर्च करावे लागतायत.
2009 बांद्रे-वरळी सी लिंक पूल प्रवासासाठी खुला करण्यात आला होता. या पूलावरुन प्रवास करणाऱ्या वाहनांना पासची सुविधाही देण्यात आली आहे. नियमित प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी पास आणि दैनिक पासची सुविधा जास्त फायदेशीर ठरतो.
फास्टटॅगचे नियम बदलणार
टोलशिवाय 1 एप्रिलापासून Fastag साठीचे नवीन नियमही लागू होणार आहेत. जर तुम्ही फास्टॅगसाठी बँकेकडे KYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तुमचं फास्टटॅग बंद होऊ शकतो.
EPFO चे नवे नियम
EPFO म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंड फंड ऑर्गनायझेशनच्या नियमातही बदल होणार आहेत. तुम्ही नोकरदार असाल तर प्रॉव्हिडंड फंड बॅलन्स हा आता आपोआप नवीन संस्थेसोबतच्या खात्यात ट्रान्सफर होईल. म्हणजे तुम्ही जुनी नोकरी सोडून नव्या नोकरीत रुजू झालात, तर तुम्हाला PF ट्रान्सफर ची प्रक्रिया करावी लागणार नाही.