नवी दिल्ली : मागच्या २४ तासांत देशामध्ये ३८६ कोरोना रुग्णांची नोंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे देशात कोरोनाग्रस्तांची संख्या १६३७ वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतीच दिली आहे. हे भयानक वास्तव पाहता सामाजिक, धार्मिक कार्यक्रम टाळा असे आवाहन देखील आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. भारत नक्की ही लढाई जिंकेल असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. पण अनेकजण हे निर्देश गांभीर्याने घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३२२ वर गेली आहे.
दरम्यान नुकत्याच आलेल्या माहितीनुसार मुंबईत कोरोनाचा नववा बळी गेला आहे. पुण्यात दोघांना कोरोनाचा संसर्ग झाला असून बुलढाण्यातही एकाला कोरोनाची लागण झाली आहे. तर मुरबाडमध्ये ३७ वर्षीय व्यक्तीला संसर्ग झाल्याचेही समोर आले आहे.
निजामुद्दीनच्या मरगजमध्ये नवी मुंबईतील १५ जण गेले होते त्यातील १२ जण आजही दिल्लीमध्ये आहेत. बाकी तिघांना नवी मुंबईतच क्वारंटाईन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी गेलेल्या साताऱ्यातील सातजणांना देखील जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन रुममध्ये ठेवण्यात आले आहे. यांच्या रक्ताचे सॅंमल पुण्यात लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.