किंग कोब्राच्या अंड्यांसोबत १०० दिवस राहिले हे तिघं

पाळीव प्राण्यांसाठी किंवा त्यांच्या पिल्लांसाठी अनेकजण झटताना पाहिले आहेत. पण जेव्हा चक्क किंग कोब्राच्या बाळंतपणासाठी कुणी खास मेहनत घेतं तेव्हा.... 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 3, 2017, 08:53 PM IST
किंग कोब्राच्या अंड्यांसोबत १०० दिवस राहिले हे तिघं  title=

केरळ : पाळीव प्राण्यांसाठी किंवा त्यांच्या पिल्लांसाठी अनेकजण झटताना पाहिले आहेत. पण जेव्हा चक्क किंग कोब्राच्या बाळंतपणासाठी कुणी खास मेहनत घेतं तेव्हा.... 

गोंधळलात ना? पण हे खरं आहे किंग कोब्राच्या अंड्यांभोवती सर्प मित्रांनी एक दोन दिवस नाही तर तब्बल १०० दिवस पहारा दिला आहे. जाणून घेऊया काय आहे हा नेमका प्रकार.....  केरळमध्ये तीन सर्प मित्रांनी एका किंग कोब्राच्या अंड्यांभोवती १०० दिवस पहारा दिला आहे. जोपर्यंत या अंड्यांतून पिल्लं जन्माला येत नाही तोपर्यंत हे तिघंही आलटून पालटून या अंड्यांभोवती पहारा देत होते. किंग कोब्रा सर्वात विषारी नागांची प्रजाती. तेव्हा अशा नागाला दिसताच गावकरी ठेचून मारतात. अनेक ठिकाणी तर त्यांची अंडी नजरेस पडली की गावकरी ती फोडून टाकतात. पण या तिघांनी हे होण्यापासून अंड्यांना वाचवलं आहे. 

चंद्रन एमपी हे वनविभागात काम करतात. त्यांना एप्रिल महिन्यात गावकऱ्यांकडून फोन आला होता. केरळमधल्या कोट्टीयूरमध्ये काही गावकऱ्यांना किंग कोब्राची अंडी दिसली. त्यांना हा मोठा नागही दिसला. हा नाग कोणालाही दंश करेल या भीतीने त्याने वनविभागात फोन करून चंद्रन यांना माहिती दिली.  चंद्रन त्यांचे दोन सहकारी विजय आणि गोवरी त्या ठिकाणी पोहोचले. या तिघांना नागाची अंडी दिसली. पण या अंड्यांच्या शेजारी मादी मात्र नव्हती. घरट्याचा पत्ता लागल्यानंतर मादीने भीतीपोटी ही अंडी तशीच सोडली असावी अशी शक्यता त्यांना वाटली. जर ही अंडी अशीच ठेवली तर गावकरी ती फोडून टाकतली तेव्हा या तिन्ही मित्रांनी या अंड्याभोवती पहारा देण्यास सुरुवात केली. तसेच या सरपटणाऱ्या जीवाला कोणतीही हानी पोहचू नये अशी विनंतीही त्यांनी गावकऱ्यांना केली. शंभर दिवसानंतर यातून पिल्लं बाहेर आली. या तिघांनीही पिल्लांना सुखरूप दूर जंगलात सोडून दिलं.

आणि आज किंग कोब्रामध्ये वाढ झाली आहे. हे निसर्ग चक्र सांभाळण्यासाठी माणूस अशा पद्धतीने देखील सहाय्य करू शकतो हे या गोष्टीतून समोर आलं आहे. चंद्रन एमपी आणि त्यांच्या दोन्ही मित्रांचं सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.