म्हणून सरन्यायाधिशांविरोधातल्या महाभियोगावर मनमोहन यांची सही नाही

विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. 

Updated: Apr 20, 2018, 08:19 PM IST
म्हणून सरन्यायाधिशांविरोधातल्या महाभियोगावर मनमोहन यांची सही नाही title=

नवी दिल्ली : विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात पदाचा दूरपयोग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.  महाभियोगात दीपक मिश्रा यांना सरन्यायाधीश पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतात आत्तापर्यंत कोणत्याही न्यायाधिशाला महाभियोगामुळे हटवता आलेलं नाही.

६० खासदारांच्या सह्या

सुत्रांच्या माहितीनुसार विरोधी पक्षाच्या ६० राज्यसभा खासदारांनी, महाभियोग नोटीसवर सह्या केल्या आहेत. विरोधी पक्षांनी उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांना महाभियोग नोटीस सोपवली आहे. डावे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने या प्रस्ताववर सह्या केल्या आहेत.

मनमोहन सिंग यांची सही नाही

खासदारांनी केलेल्या या सह्यांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची सही घेण्यात आलेली नाही. काँग्रेसनं एक रणनिती म्हणून मनमोहन सिंग यांची या पत्रावर सही घेतली नाही.  मनमोहन सिंग हे माजी पंतप्रधान आहेत. त्यांच्या पदाचा सन्मान म्हणून आम्ही मनमोहन सिंग यांची सही घेतली नाही, असं काँग्रेस नेते कपील सिब्बल म्हणाले आहेत. या प्रस्तावावर चिदंबरम यांनीही सही केलेली नाही. चिदंबरम यांच्या केस सुरु आहेत. या केसवर प्रभाव पडू नये म्हणून आम्ही त्यांची सही घेतलेली नाही, असं सिब्बल यांनी स्पष्ट केलं.

या पक्षांचा समावेश

सध्या टीएमके, तृणमूल काँग्रेस, आणि डीएमकेने महाभियोग नोटीसवर अजून सह्या केलेल्या नाहीत. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधातील महाभियोगावर ज्या ज्या पक्षांनी सह्या केल्या आहेत, त्यात काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, मुस्लीम लीग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा समावेश आहे.