IMD monsoon 2024 predictions : काही दिवसांपूर्वीच मान्सूनच्या आगमनाच्या चर्चांना सुरुवात झाली आणि आता भारतीय हवामानशास्त्र विभागानं यंदाच्या मान्सूनचा पहिलावहिला अंदाज वर्तवत बळीराजासह सर्वांनाच मोठा दिलासा दिला आहे. सोमवारी IMD नं घेतलेल्या एका पत्रकारपरिषदेदरम्यान यंदाच्या वर्षी देशात 8 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
2024 मधील मान्सूनच्या पहिल्या अंदाजानुसार यंदा सरासरीहून जास्त पावसाची शक्यता असून, 5 जून ते 30 सप्टेंबरदरम्यान सर्वत्र पाऊसच पाऊस असणार आहे. हवामान शास्त्रज्ञ एम. रविचंद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या मान्सून साठी सध्याची परिस्थिती आशादायी असून, दक्षिण पश्चिम मान्सूनच्या दृष्टीने समुद्रातील परिस्थिती आशादायी असेल. एकंदर आकडेवारी आणि वाऱ्याची स्थिती पाहता मान्सूनसाठी ही स्थिती पूरक असल्याचं स्पष्ट होत आहे.
आयएमडीचे संचालक एम. मोहपात्रा यांनीसुद्धा यंदाच्या वर्षी मान्सूनचं प्रमाण सरासरीहून अधिक राहणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. देशात जून ते सप्टेंबर हे पावसाळी महिने असून, त्यादरम्यान साधारण 87 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या अल निनो ची परिस्थितीही सर्वसामान्य असून पावसाळा सुरू झाल्यावर अल निनोचा प्रभाव संपला असेल (neutral परिस्थिती).
एकिकडे आयएमडीनं यंदाच्या वर्षी 106 टक्के मान्सूनची शक्यता वर्तवलेली असतानाच दुसरीकडे स्कायमेटनं काही दिवसांपूर्वीच यंदाच्या वर्षी 102 टक्के पावसाची शक्यता वर्तवली होती. या खासगी हवामान संस्थेनं जून ते सप्टेंबरच्या काळात यंदाच्या वर्षी साधारण 95 टक्के पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला असून यंदा देशाच्या दक्षिण पश्चिमेसोबत उत्तर पश्चिमेला समाधानकारक पाऊस होईल असं सांगितलं आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये मात्र पाऊस चकवा देईल असा इशाराही Skymet नं दिला आहे.