चेन्नई: अभिनेते आणि राजकारणी रजनीकांत यांनी आगामी राजकीय वाटचालीबाबत केलेल्या सूचक वक्तव्यामुळे दक्षिणेकडील राज्यात बस्तान बसवण्याचे भाजपचे मनसुबे धुळीला मिळण्याची शक्यता आहे.
रजनीकांत यांनी गेल्यावर्षी राजकीय पक्षाची स्थापन केली होती. यानंतर त्यांची एकूण भूमिका भाजपशी जवळीक साधणारी असल्याची चर्चा होती. मात्र, रजनीकांत यांनी सोमवारी केलेले वक्तव्य भाजपसाठी धोक्याची घंटा मानले जात आहे.
भाजपकडून आपल्याला धोका असल्याचे दक्षिणेतील पक्षांना वाटते. याबाबत रजनीकांत यांनी विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, जर इतर पक्षांना भाजप धोकादायक वाटत असेल तर तसे असलेच पाहिजे. त्यांच्या या विधानामुळे भाजपसाठी दक्षिणेकडील राजकारणाचे समीकरण पूर्णपणे बदलू शकते.
याशिवाय, रजनीकांत यांनी नोटाबंदीच्या भूमिकेवर यापूर्वी घेतलेल्या भूमिकेवरूनही घुमजाव केले. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर रजनीकांत यांनी ट्विटरवरून त्यांचे अभिनंदन केले होते.
मात्र, आता रजनीकांत यांनी अंमलबजावणीतील त्रुटींवर बोट ठेवले आहे. नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी चुकली. हा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने नीट अभ्यास करायला पाहिजे होता, असे रजनीकांत यांनी सांगितले.