VIDEO : सेल्फी ले ले रे! साथीदारांमध्ये रमलेले अभिनंदन वर्थमान म्हणतात....

अभिनंदन वर्थमान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Updated: May 5, 2019, 07:50 AM IST
VIDEO : सेल्फी ले ले रे! साथीदारांमध्ये रमलेले अभिनंदन वर्थमान म्हणतात....  title=

श्रीनगर : भारतीय वायुदलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वायुदलाच्या सेवेत रुजू असलेले वर्थमान हे त्यांच्या साथीदारांमध्ये रमलेले पाहायला मिळत असून, त्यांच्यासोबत फोटो काढताना दिसत आहेत. अभिनंदन हे सध्याच्या घडीला सर्वांसाठी एक सेलिब्रिटीच आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह त्यांच्या सहकाऱ्यांनाही आवरता आला नाही. याचीच झलक एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी खुद्द वर्थमान यांच्या चेहऱ्यावरील आनंदही पाहण्याजोगा आहे. 

साथीदीरांसोबत सेल्फी आणि असंख्य फोटो काढल्यानंतर हे सर्व फोटो तुमच्यासाठी नसून ते तुमच्या कुटुंबीयांसाठी असल्याचं वर्थमान आवर्जून सांगत आहेत. त्यांच्या आणि असंख्य देशवासियांच्या प्रार्थनांमुळेच मी माझ्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं ते सांगत असून आपण ज्यांना भेटू शकलो नाही त्यांच्यासाठीच हे फोटो आहेत, असं ते सांगत आहेत. यावेळी त्यांच्या साथीदारांचा आनंदही पाहण्याजोगा होता. अभिनंदनही प्रत्येक साथीदारासोबत फोटो काढत असून, त्यांची भेट घेत असल्याचं पाहायला मिळालं. 

सुरक्षेच्या कारणामुळे श्रीनगर हवाई तळावरून बदली...

सर्वांचेच आभार मानणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना सुरक्षेच्या कारणामुळे श्रीनगर हवाई तळावरुन त्यांच्या बदली करण्यात आली आहे. पश्चिमेकडे असणाऱ्या कोणा एका महत्त्वाच्या हवाई तळावर त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर या हल्ल्याचं चोख प्रतुत्तर देण्यासाठी म्हणून पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात भारतीय वायुदलाकडून एअरस्ट्राईक करण्यात आला होता. ज्यानंतर भारताच्या या हल्ल्याचं उत्तर म्हणून पाकिस्तानी वायुदलाच्या काही लढाऊ विमानांनी भारताची हवाई हद्द ओलांडली. पाकिस्तानच्या एफ १६ या विमानांना परतवून लावताना त्यांच्यावर भारताकडूनही हल्लाबोल करण्यात आला. यावेळी विंग कमांडर अभिनंदन हे मिग २१ बायसनची धुरा सांभाळत होते. पाकिस्तानची घुसखोरी परतवून लावण्याच्या त्यांच्या याच प्रयत्नांत वर्थमान यांच्या विमानावरही पाकिस्तानकडून निशाणा साधण्यात आला होता, ज्यानंतर ते पाकिस्तानच्या हद्दीत दुखापतग्रस्त अवस्तेत पोहोचले. पुढे त्यांना पाकिस्तानी सैन्याकडून ताब्यातही घेण्यात आलं. परिणामी भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये असणाऱ्या तणावग्रस्त वातावरणात आणखी वाढ झाली. पण, भारताकडून होणारा एकंदर दबाव पाहता पाकिस्तानने काही तासांत अभिनंदन वर्थमान यांना भारताकडे सुपूर्द केलं. या संपूर्ण घटनेदरम्यान अभिनंदन वर्थमान पाहता पाहता प्रत्येक देशवासियाच्या अभिमानाचं निमित्त ठरले.