तुम्ही घरात किती सोनं ठेवू शकता? विकल्यावर Tax लागणार का? नियम जाणून घ्या

Gold Storage Limit in India: घरात सोनं ठेवण्यासाठीदेखील काही नियमांचे पालन करावे लागते. घरात सोनं किती ठेवावं, याची माहिती जाणून घ्या 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 12, 2024, 01:06 PM IST
तुम्ही घरात किती सोनं ठेवू शकता? विकल्यावर Tax लागणार का? नियम जाणून घ्या title=
How much gold can you keep at home check Storage Limit & Tax

Gold Storage Rule In India: भारतातील लोकांसाठी सोनं हा खुप महत्त्वाचा ऐवज आहे. लग्नसमारंभात किंवा घरच्या कार्यात सोन्याचे अलंकार आवर्जुन घातले जातात. काही लोकांसाठी तर सोन हे स्टाइल व स्टेटस सिम्बोलदेखील आहे. भारतात सोनं फक्त गुंतवणूक म्हणूनच नाही तर परंपरा म्हणूनही खरेदी करतात. म्हणूनच कोणत्याही शुभ प्रसंगी सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. महिलांसाठी सोनं हे शृंगाराचे साधनदेखील आहे. तर, कठिण काळात सोनं गहाण ठेवूनही पैसे उभे केले जातात. पण तुम्हाला माहितीये का? घरात आपण किती सोनं ठेवू शकतो. 

सोनं घरात ठेवल्यास चोरांची व दरोडेखोरांची भीती असते. त्यामुळं सुरक्षेच्या कारणास्तव सोनं बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलं जातं. मात्र, तुम्हाला माहितीये का घरात सोनं किती ठेवता येऊ शकते. घरात सोनं ठेवायची लिमिट काय आहे. मर्यादेपेक्षा जास्त सोनं घरात ठेवल्यास काय होतं. तसंच, सोन्याची विक्री केल्यानंतर टॅक्स भरावा लागतो का? याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. 

घरात सोनं ठेवण्याची लिमीट?

भारत सरकारच्या आयकर विभागाकडून घरात सोन ठेवण्यासाठी एक मर्यादा घालून दिली आहे. त्यानुसार, महिला आणि पुरुष दोघांसाठी ही मर्यादा वेगवेगळी आहे. CBDT (Central Board of Direct Taxes) अंतर्गंत तुम्ही घरात एका मर्यादेपर्यंतच सोनं ठेवू शकतात. जर तुम्ही या मर्यादेपेक्षा जास्त सोनं घरात ठेवत असाल तर तुम्हाला त्याचे पुरावे सादर करावे लागणार आहेत. तुम्हाला सोन्याच्या खरेदीसंदर्भातील रिसीट दाखवावी वागणार आहे. 

महिला घरात किती सोनं ठेवू शकतात?

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विवाहित महिला त्यांच्याजवळ 500 ग्रॅम सोनं ठेवू शकतात. तर अविवाहित महिला 250 ग्रॅम सोन ठेवू शकतात. तर, पुरुषांना फक्त 100 ग्रॅम सोनं ठेवण्याची परवानगी आहे. 

पूर्वजांकडून मिळालेल्या सोन्यावर किती कर भरावा लागतो?

तुम्ही घोषित उत्पन्नातून किंवा करमुक्त उत्पन्नातून सोने खरेदी केले असेल किंवा सोने कायदेशीररित्या वारसाहक्काने मिळाले असेल, तर तुम्हाला त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. नियमांनुसार, घालून दिलेल्या मर्यादेत दागिने सापडले तर ते सरकारकडून जप्त केले जाणार नाहीत. मात्र, मर्यादेपेक्षा जास्त सोने आढळल्यास त्याची पावती व पुरावे द्यावे लागणार. 

सोन्याची विक्री केल्यास किती कर द्यावा लागणार?

घरात ठेवलेल्या सोन्यावर कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. मात्र, जर तुम्ही सोन्याची विक्री केली तर त्यावर तुम्हाला कर भरावा लागतो. जर तुम्ही 3 वर्ष सोनं घरात ठेवल्यानंतर त्याची विक्री करता तर त्यावर होणाऱ्या नफ्यावर 20 टक्के दराने लॉन्ग टर्म कैपिटल गेन्स (LTCG) कर भरावा लागतो.