मुंबई : देशभरामध्ये पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. डॉलरच्या तुलनेत कमजोर होत चाललेला रुपया आणि कच्च्या तेलाचे वाढलेले भाव यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. मुंबईमध्ये आज पेट्रोल ८८.२६ रुपये प्रती लिटर तर डिझेल ७७.४७ रुपये प्रती लिटर मिळतंय. मुळात ४० रुपयांना असणारं पेट्रोल सर्वसामान्यांना ८८ ते ८९ रुपयांना मिळत आहे. इंडियन ऑईल कॉरपोरेशन ३९.२१ रुपये लीटरनं इंधन पेट्रोल पंप डीलरना देतं. सगळे कर आणि पेट्रोल पंप डिलरचं कमीशन मिळून पेट्रोल-डिझेलचे दर ठरतात.
४० रुपये ६४ पैशांना पेट्रोल बाजारात येतं. यावर महाराष्ट्र सरकार १५.५० रुपये व्हॅट लावते. तसंच महाराष्ट्र सरकारनं ९ रुपयांचा सेस (जादाचा कर) लावला आहे. केंद्र सरकारनं पेट्रोलवर १९.४८ रुपये एक्साईज ड्यूटी लावली आहे. यामुळे पेट्रोल ८८.२६ रुपयांना मिळत आहे.
हाय स्पीड डिझेलसाठी १५.३३ रुपये आणि ब्रॅण्डेड हाय स्पीड डिझेलसाठी १७.६९ रुपये एक्साईज ड्यूटी घेतली जाते. महाराष्ट्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर मुंबईत ३९.१२ टक्के आणि ठाण्यात २४.७८ टक्के व्हॅट लावते. तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये ३८.११ टक्के पेट्रोलवर आणि २१.८९ टक्के डिझेलवर व्हॅट लावण्यात येतो.
पेट्रोल पंप ज्या ठिकाणी आहे त्यावर पेट्रोल पंप डीलरचं कमीशन ठरवलं जातं. पेट्रोल पंप डीलरना प्रती लिटर पेट्रोलमागे ३ रुपये ते ३ रुपये ६५ पैसे मिळतात. तर डिझेलसाठी डीलरना २ रुपये ते २.६२ रुपये प्रती लिटर मिळतात. ऑगस्ट महिन्यात पेट्रोल पंप डिलरना मिळत असलेली रक्कम ५५ टक्क्यांनी वाढवण्यात आली होती.