अशी कशी ही विषमतेची दरी? 30 तासात एक अब्जाधीश तर 33 तासांमध्ये 10 लाख गरिब होताहेत...

कोरोनाने जगात आर्थिक विषमता वाढली. अब्जाधीशांची मागील 23 वर्षात जितकी संपत्ती वाढली नाही इतकी संपत्ती दोन वर्षाच्या काळात वाढली असा दावा ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या ( Oxfam International  ) अहवालात करण्यात आलाय.

Updated: May 24, 2022, 04:58 PM IST
अशी कशी ही विषमतेची दरी? 30 तासात एक अब्जाधीश तर 33 तासांमध्ये 10 लाख गरिब होताहेत... title=

नवी दिल्ली : Oxfam International ने आपल्या अहवालात, कोरोना महामारीच्या काळातील 24 महिन्यात अब्जाधीशांची संपत्ती मोठ्या प्रमाणावर वाढली. मागील 23 वर्षांमध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये इतकी वाढ कधीच झाली नव्हती, असा दावाही या अहवालातून करण्यात आलाय.

जगात सध्या 2668 अब्जाधीश आहेत. त्यांच्याकडे 12.7 ट्रिलियन डॉलर म्हणजे जवळपास 984.95 लाख कोटी इतकी संपत्ती आहे. जगाच्या जीडीपीच्या 14 टक्के इतका हा आकडा आहे.

कोरोनानंतर जगात अब्जाधीशांच्या संख्येत आणखी 573 जणांची भर पडली. म्हणजेच दर 30 तासाला एका अब्जाधीश नव्याने तयार होत होता. त्यांच्या संपत्तीत 42 टक्के म्हणजेच 293.16 लाख कोटींची भर पडली. 

जगातील 10 सर्वोच्च अब्जाधीशांकडे असलेली संपत्ती ही 3.1 अब्ज लोकसंख्येकडे असलेल्या संपत्तीइतकी आहे. कोरोना काळात फार्मा उद्योगाशी संबंधित 40 जण अब्जाधीश झाले. मॉडर्ना, फायजर या कंपन्यांनी प्रति सेकंदाला 1 हजार डॉलरचा नफा कमावला असे या अहवालात म्हटले आहे.

कोरोना काळात 99 टक्के लोकांची कमाई घटली. 2021 मध्ये 12.5 कोटींहून अधिकजण बेरोजगार झाले. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी स्त्री-पुरुष यांच्या वेतनातील भेदभाव संपुष्टात येण्यासाठी 100 वर्ष लागतील असा अंदाज होता. परंतु, ही शक्यता आता 136 वर्ष इतकी वाढल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ऑक्सफॅमच्या या अहवालानुसार गेल्या वर्षी खाद्यपदार्थांच्या किमती 33.6 टक्क्यांनी वाढल्या. यंदाही त्यात 23 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अन्नधान्याच्या किमती वाढल्याने जगात आणखी गरिबी वाढेल. 26.3 कोटी लोक यावर्षी खूप गरीब असतील. त्यानुसार दर 33 तासांनी 1 कोटी लोक गरीब होतील, असा अंदाज या अहवालातून व्यक्त करण्यात आलाय.