गुजरात निवडणूकीचे राज्याच्या राजकारणावर झाले हे परिणाम...

  गुजरात निवडणूकीचे राज्याच्या राजकारणावर खोलवर परिणाम झालेले दिसत आहेत.

Updated: Dec 19, 2017, 03:28 PM IST
गुजरात निवडणूकीचे राज्याच्या राजकारणावर झाले हे परिणाम... title=

दीपक भातुसे, झी मीडीया, नागपूर:  गुजरात निवडणूकीचे राज्याच्या राजकारणावर खोलवर परिणाम झालेले दिसत आहेत.

गुजरात : राजकीय प्रयोगशाळा

गुजरातमधील निकालाची कधी नव्हे तेवढी देशभरातील जनतेला उत्सुकता होती. याची अनेक कारणे होतीच, मात्र त्याबरोबरच महत्त्वाचे कारण होते ते गुजरात निकालाचा प्रत्येक राज्यातील राजकारणावर परिणाम होणार होता. आगामी काळात गुजरात निकालाचे परिणाम आपल्या राज्यातील राजकारणावरही दिसून येणार आहेत. 

आशा निराशा

एकीकडे गुजरातमध्ये काँग्रेसचा पराभव झाला असला तरी या निकालाने राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नवी ऊर्जा दिली आहे. तर दुसरीकडे भाजपाने गुजरातमध्ये विजय मिळवला असला तरी या निकालाने राज्यातील भाजपाला सावध केलं आहे. 

गुजरातच्या निकालाचे अन्वयार्थ

गुजरातच्या निकालाचे वेगवेगळे अर्थ प्रत्येक जण काढत आहे. पण एका वाक्यात या निकालाचे वर्णन करायचे म्हटले तर या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होऊनही काँग्रेस जिंकली आहे तर भाजपाचा विजय होऊनही भाजपा हरले आहे. 2014 लोकसभेत निर्विवाद सत्ता मिळवल्यानंतर भाजपाचा वारू चौफेर उधळला होता. 

फक्त य़शच

दिल्ली आणि बिहार ही दोन राज्य वगळली तर 2014 नंतर झालेल्या प्रत्येक राज्याच्या निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवले. उत्तर प्रदेशात तर भाजपाने चमत्कार केला होता. महाराष्ट्रातही आतापर्यंतच्या सर्वाधिक जागा जिंकून भाजपाने सत्ता स्थापन केली. 

महाराष्ट्रातली भाजपची घौडदौड

महाराष्ट्रातील सत्ता हस्तगत केल्यापासून राज्यात झालेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपाने आपली विजय घौडदौड सुरूच ठेवली आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष हतबल झाले आहेत. भाजपाला रोखायचे कसे हा प्रश्न महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससमोर आहे. मात्र गुजरातच्या निकालाने या दोन्ही काँग्रेस पक्षांना याचं उत्तर मिळालं आहे असं म्हणावं लागेल. 

काँग्रेस-राष्ट्रवादीला आशेचा किरण

राहुल गांधींना गुजरातच्या निवडणूक प्रचारात मिळालेला जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना त्यांच्या राज्याला काँग्रेसने लावलेला सुरुंग या बाबी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. गुजरातमध्ये काँग्रेसला सत्ता मिळली नसली तरी काँग्रेसने जी कामगिरी केली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह संचारलाय. आपण संघर्ष केला, मेहनत घेतली आणि सातत्य राखले तर भाजपाचा पराभव करू शकतो हा मंत्र गुजरात निवडणुकीने राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे.

भाजपला इशारा

भाजपाने गुजरातची सत्ता राखून देशात तब्बल 19 राज्यांमध्ये आपल्या सत्तेचा विस्तार केला आहे. कधी नव्हे ते भाजपाने केलेल्या या कामगिरीमुळे आणि गुजरातच्या विजयामुळे भाजपामध्ये उत्साह असला तरी तो म्हणावे तेवढा नाही. कारण मोदी-शहांच्या गुजरातमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने भाजपाला घाम फोडला होता. त्यामुळेच गुजरातमधील काठावरच्या विजयामुळे राज्यातील भाजपाचे नेते सावध झाले आहेत. 

गुजरातने दिला महाराष्ट्र भाजपला धडा

गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या जोमाने कामाला लागेल याची कल्पना भाजपाला आहे. त्यामुळे भाजपानेही यापुढे अधिक सावधपणे पावलं टाकण्याचं ठरवलं असावं. राज्यातील सत्तेची पावणे दोन वर्ष आता भाजपाच्या हातात आहेत. या पावणेदोन वर्षात सरकारची आणि संघटनेची कामगिरी सुधारण्यावर भाजपाचा कदाचित भर असणार आहे.

गुजरात निवडणुकांचे पडसाद

गुजरातच्या निकालाने राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अधिक जवळ आणले आहे. गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळी निवडणूक लढवली होती. त्याचा फटका काही जागांवर काँग्रेसला बसला आहे. नाही तर गुजरातमध्ये काँग्रेसच्या आणखी जागा वाढल्या असत्या. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात राष्ट्रवादीला बरोबर घेण्याची काँग्रेसची भूमिका असण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीला उपरती

तर दुसरीकडे गुजरातमध्ये निवडणूक लढवल्याचा पश्चाताप राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बोलण्यातून जाणवतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ही चूक टाळण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यापूर्वी वारंवार प्रश्न चिन्हं उपस्थित केलं होतं. मात्र गुजरात निकालाने शरद पवार यांच्यानंतर असलेल्या राष्ट्रवादीतील नेतृत्वाच्या फळीने राहुल गांधी यांचे मोठेपण मान्य केलं आहे.

गुजरात निवडणुकांची फलश्रुती

एका राज्याच्या निवडणुकीचे निकाल दुसऱ्या राज्याच्या राजकारणावर परिणाम करू शकतात हे गुजरातच्या निवडणुकीने दाखवून दिले आहे. या निवडणुकीने काँग्रेस-राष्ट्रवादीला नवं बळ दिलं आहे तर भाजपालाही एक धडा शिकवला आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारणाची दिशा गुजरात निकालामुळे बदलण्याची शक्यता आहे.