लखनऊ : अयोध्या वादग्रस्त जमिनीचा निर्णय आल्यावर अयोध्येत सौहार्द कायम रहावा यासाठी हिंदू आणि मुस्लिम समाजातर्फे सदभावना कायम राखण्याचं आवाहन करण्यात येत आहे. बाबरी मशीद पक्षकार इकबाल अंसारी यांच्या उपस्थितीत हे आवाहन करण्यात आलं. तर न्यायालयीन लढा सुरू असला तरी प्रत्यक्षात दोन्ही समाजात कोणताही तणाव नाही आणि भविष्यातही नसेल असं आचार्य सत्येंद्र दास यांनी म्हटलं आहे.
मुस्लीम संघटनेचे अधिकारी आणि मौलवी यांनी अयोध्या प्रकरणावर बैठक घेतली. अयोध्येच्या बाबतीत येणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करण्याचं यावेळी सगळ्यांनी म्हटलं. ऑल इंडिया मुस्लीम मजलिस-ए-मुशावरतचे अध्यक्ष नवेद हामिद यांनी ही बैठक बोलवली होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शांती आणि सद्भाव कायम ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.
याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)ने देखील सुप्रीम कोर्टाचा जो ही निर्णय येईल त्याचं खुल्या मनानं स्वागत करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. लवकरच अयोध्या प्रकरणात निर्णय़ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात शांतता कायम राहावी यासाठी आरएसएसकडून आवाहन करण्यात आलं आहे.