मनाली : लाहौलला कुल्लूशी जोडणारा रोहतांग पास बुधवारी वाहनांसाठी खुला करण्यात आला. पम, त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच हिमवादळामुळे जवळपास २० वाहनं रोहतांग पास मार्गावर अडकली. बीआरओकडून अथक परिश्रमांनंतर जवळपास चार तासांच्या कालावधीनंतर या वाहनांना वाट मोकळी करुन देण्यात आली.
वाहनं अडकल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बीआरओच्या तुकडीने घटनास्थळी धाव घेतली. डोजर आणि जेसीबीच्या सहाय्याने तातडीने बचावकार्यास सुरुवात करण्यात आली. हिमवादळामुळे सध्या या परिसरातील रस्त्यांवर बर्फ आल्यामुळे अनेक अडचणी उद्भवत आहेत.
बुधवारी रोहतांग पास खुला होताच लाहौल- स्पितीमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. हा मार्ग सुरु झाल्यापासून लगेचच बीआरओकडून लाहौल - स्पितीमधील वाहनांना मनालीवाटे बाहेर काढण्याचं काम सुरु झालं. सध्याच्या घडीला संपूर्ण उत्तर भारतात, विषेशत: हिमाचल प्रदेश भागात तापमानाचा पारा खाली जात असल्यामुळे स्थानिक आणि पर्यटकांना सावधगिरीचे आदेश देण्याच येत आहेत.
दरम्यान, सद्यस्थिती पाहता मनाली प्रशासनाकडून मंडी आणि लाहौल प्रशासनाकडून कोकसर येथे पोलीस बचावकक्ष स्थापन करण्यात आले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार २० ते २३ नोव्हेंबर या दिवसांमध्ये सदर भागातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल अपेक्षित असून, पाऊस आणि हिमवर्षाव होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.