PHOTOS : नंदनवन, देवभूमी गोठली; आतापर्यंतच्या सर्वाधिक बर्फवृष्टीची नोंद

देशभरात सध्या थंडीची लाट पसरली असून सर्वत्र तापमानाचा पारा खाली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Updated: Jan 5, 2019, 12:52 PM IST
PHOTOS : नंदनवन, देवभूमी गोठली; आतापर्यंतच्या सर्वाधिक बर्फवृष्टीची नोंद  title=

मुंबई : देशभरात सध्या थंडीची लाट पसरली असून सर्वत्र तापमानाचा पारा खाली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. भारताचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीर खोऱ्याच्या परिसरात तापमानाने निचांक गाठला असून, आतापर्यंतच्या सर्वाधिक बर्फवृष्टीची नोंद या परिसरात करण्यात आली आहे. 

जम्मू काश्मीर येथे होत असलेल्या जोरदार बर्पवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्याचा संपूर्ण देशाशी असणारा संपर्क तुटला आहे. शुक्रवारी रात्री खोऱ्यात विक्रमी बर्फवृष्टीची नोंदही करण्यात आली. जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये शनिवारी सकाळी जवळपास १० इंच बर्फाची चादर पाहायला मिळाली. तर, काझिगुंडमध्ये ११ इंच, पहलगामममध्ये १६ इंच आणि पुलवामामध्ये एका रात्रीत १७ इंच इतका बर्फ साचल्याची नोंद करण्यात आली.  

काश्मीर खोऱ्यात सध्या सर्वत्र रस्ते, घरं, झाडं आणि डोंगरांवर बर्फाचे थर साचले असून, राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्त्वाचे रस्तेही बंद पडल्याचं कळत आहे. हवाई सेवेसह रेल्वेवरही हवामानातील या बदलाचा परिणाम झाला आहे. गेल्या काही वर्षांमधील ही सर्वात जास्त बर्फवृष्टी असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मुख्य म्हणजे पुढचे काही दिवस वातावरणात अशा प्रकारचे बदल अपेक्षित असून पारा आणखी निचांक गाठू शकतो असंही म्हटलं जात आहे.  

फक्त जम्मू- काश्मीर परिसरातच नव्हे तर हिमाचल प्रदेश भागातही पारा चांगलाच खाली गेला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हिमाचल प्रदेशातील किन्नूरमधील पूह या परिसराचे काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. ज्यामध्ये संपूर्ण परिसरात फक्त आणि फक्त बर्फाच्छादित डोंगररांगाच नजरेस पडत आहेत.