नवी दिल्ली : हायकोर्टाचे निकाल पक्षकारांच्या भाषेत त्यांना कळतील अशा प्रकारे लिहिले जावेत यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भर दिला आहे. निकालांच्या प्रमाणित भाषांतरित प्रती जारी करण्याची यंत्रणा स्थापन करण्याची सूचनाही त्यांनी केली. केवळ लोकांपर्यंत न्याय पोहोचणे पुरेसे नसून त्यांना समजत असलेल्या भाषेत तो कळावा याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले.
हायकोर्ट इंग्रजीत निकाल देतात मात्र आपला देश बहुभाषिक आहे. त्यामुळे पक्षकारांना निकालातील चांगले मुद्दे कळत नाहीत. त्यामुळे निकालासाठी त्यांना भाषांतर किंवा वकिलावर विसंबून रहावं लागतं. हे टाळण्यासाठी निकाल पक्षकारांना कळणा-या भाषेत हवेत असं त्यांनी सुचवलं आहे. शिवाय न्यायाला विलंब होण्याचा सगळ्यात जास्त फटका सगळ्यात गरीब आणि उपेक्षित असलेल्या लोकांना बसतो. त्यामुळे खटल्यांचा निपटारा लवकरात लवकर केला जावा असं आवाहनही त्यांनी केलं.
खटल्यांमध्ये तारखा घेणं ही न्यायालयाची कार्यवाही लांबवण्याची युक्ती म्हणून वापरण्याऐवजी आणीबाणीच्या परिस्थीत अपवाद म्हणून त्याचा उपयोग करावा असं कोविंद यांनी म्हटलं आहे. केरळ हायकोर्टाच्या हीरकमहोत्सवी समारंभाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.