बर्फात मस्ती करायची असेल तर भारतातली ही ठिकाणं जरुर प्लान करा

राज्याच्या राजधानीपासून २५० किलोमीटर अंतरावर असलेल्या सोलांग भागातही बर्फवृष्टी झालीय

Updated: Jan 7, 2020, 03:24 PM IST
बर्फात मस्ती करायची असेल तर भारतातली ही ठिकाणं जरुर प्लान करा title=

शिमला : तुम्हालाही बर्फात खेळणं आवडत असेल तर तुम्ही तुमची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी हिमाचल प्रदेशचा नक्कीच प्लान करू शकता. लोकप्रिय पर्यटनस्थळ शिमला (Shimla) आणि मनाली (Manali) इथं सध्या चांगलीच बर्फवृष्टी सुरू आहे. तर मंगळवारी हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ भागात बऱ्याच ठिकाणी पाऊसही पडला. त्यामुळे तपमान बऱ्याच अंशी घसरलंय. बर्फवृष्टीमुळे अधिकाधिक पर्यटक इकडे आकर्षित होतील. त्यामुळे हॉटेल मालकही खुशीत आहेत.

शिमलाजवळच कुफरी, फागू आणि नरकंडा यांसारख्या पर्यटनस्थळीही बर्फवृष्टी झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे हिमालयाच्या टेकड्यांच्या सुंदरतेत आणखीनच भर पडलीय. शिमलामध्ये किमान तपमान शून्य ते ०.१ डिग्री सेल्शिअसपेक्षाही कमी नोंदवलं गेलंय. तर कुफरी भागात शून्य ते ३.४ डिग्री सेल्सिअसपेक्षाही कमी तपमानाची नोंद झालीय. 

राज्याच्या राजधानीपासून २५० किलोमीटर अंतरावर असलेल्या सोलांग भागातही बर्फवृष्टी झालीय. मनालीपासून ५२ किलोमीटर दूर रोहतांग पासच्या रस्त्यावरही बर्फ साचलाय.

बुधवारपर्यंत शिमला, कुल्लू, किन्नौर, लाहौल-स्पीटी आणि चंबा जिल्ह्यांत बर्फवृष्टी होऊ शकते, असा इशारा हवामान विभागानं दिलाय. सोमवारी सकाळी उंच डोंगराळ भागात हलकी बर्फवृष्टी झाली तर मध्य आणि पर्वतरांगांच्या खालच्या भागात पाऊस पडल्याचंही त्यांनी सांगितलंय.