महिलांनी प्रवेश केला तर टाळं लावणार - शबरीमला मुख्य पुजारी

'महिलांनी मंदिरात प्रवेश केला तर मंदिराला टाळं ठोकून चाव्या सोपवू

Updated: Oct 19, 2018, 12:42 PM IST
महिलांनी प्रवेश केला तर टाळं लावणार - शबरीमला मुख्य पुजारी title=

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही शबरीमला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश मिळू शकलेला नाही. शुक्रवारी दोन महिलांनी पुन्हा एकदा या मंदिरात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांना तब्बल २५० पोलीस कर्मचाऱ्यांकडून सुरक्षा असतानाही या महिलांना मंदिरात प्रवेशाविनाच माघारी परतावं लागलं. 

शबरीमला मंदिराचे मुख्य पुजारी कंदारारू राजीवारू या परिस्थितीमुळे चिंतेत आहेत. शुक्रवारी दोन महिला मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहचल्या तेव्हा या महिलांना प्रवेश मिळू देणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. 

'महिलांनी मंदिरात प्रवेश केला तर मंदिराला टाळं ठोकून चाव्या सोपवू' असं या पुजाऱ्यांनी म्हटलंय. मी भाविकांसोबत आहे... याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही, असंही त्यांनी म्हटलं.

सन्निधानममध्ये जमलेल्या आंदोलकांनी कोणत्याही परिस्थितीत १० ते ५० वयाच्या महिलांना मंदिरात प्रवेश देणार नसल्याचं म्हटलंय. आपण शबरीमला मंदिराची सुरक्षा करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.