नवी दिल्ली : शबरीमला मंदिरात महिलांचा प्रवेशाचा वाद थांबण्याचं नाव घेत नाहीय. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशानंतरही अद्यापपर्यंत या मंदिरात महिलांना प्रवेश मिळू शकलेला नाही. गुरुवारनंतर आज शुक्रवारीही आंदोलकांकडून महिलांची अडवणूक सुरूच आहे.
या दरम्यान एका महिला पत्रकारासोबतच आणखी दोन महिला एन्ट्री पॉईंटवर पोहचल्यानंतर स्थिती तणावपूर्ण झालीय. पोलीस सुरक्षेसोबत मंदिरापर्यंत पोहचणाऱ्या दोन्ही महिलांना दर्शन न घेताच माघारी परतावं लागलंय. केरळच्या आयजींनी दिलेल्या माहितीनुार, दोन्ही महिलांना परिस्थिती समजावून सांगण्यात आली होती... परंतु, अद्याप परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे.
एका परदेशी मीडिया संस्थेसाठी काम करणारी हैदराबादची एक महिला पत्रकार गुरुवारी मंदिरात दर्शन घेऊ शकली नव्हती. त्यानंतर शुक्रवारीही आणखी एका महिलेनं मंदिराकडे आगेकूच केली होती.
सबरीमला मंदिरात सर्ववयोगटातील महिलांना प्रवेशाच्या निर्णायनंतर उफाळेलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी आज मंदिर समितीची बैठक तिरुअनंतपुरममध्ये होणार आहे.