मुंबई : पीएमसी बँकेमध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर २ ग्राहकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता खासगी बँकाही सावध झाल्या आहेत. एचडीएफसी बँकेनं ग्राहकांच्या पासबूकवर याबाबत माहिती द्यायला सुरुवात केली आहे. बँकेकडून ग्राहकांच्या खात्यात १ लाखापेक्षा जास्त रक्कम असेल, तर ती जबाबदारी बँकेची नाही, असा संदेश छापण्यात आला आहे. यासाठी डीआयसीजीसीच्या नियमांचा हवाला देण्यात आला आहे.
ग्राहकांनी जमा केलेले पैसे डीआयसीजीसीकडे वीमाकृत आहे. त्यामुळे जर बँकेचं दिवाळं निघालं तर डीआयसीजीसी ग्राहकांचे पैसे द्यायला जबाबदार आहे. ग्राहकांचे १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम द्यायला बँक जबाबदार आहे, असं पासबूकवर छापण्यात आलं आहे.
पंजाब-महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेत घोटाळा समोर आल्यानंतर ग्राहक अडचणीत आले आहेत. काही दिवसांपूर्वी ग्राहकांना बँकेतून फक्त १ हजार रुपये काढता येत होते. आरबीआयने हे निर्बंध आणले होते. यानंतर आता ग्राहकांना ४० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. पण घोटाळ्यामुळे हजारो ग्राहकांचे पैसे अडकले आहेत.
डीआयसीजीसी म्हणजेच डिपॉझिट इन्श्यूरन्स ऍण्ड क्रेटिड गॅरंटी कॉर्पोरेशन ही आरबीआयची सहयोगी संस्था आहे. देशाच्या सगळ्या कमर्शियल आणि को-ऑपरेटिव्ह बँकांमध्ये जमा होणारे पैसे डीआयसीजीसीकडे वीमा केलेले असतात.