'बलात्कार' हे युद्धाचं शस्र मानणाऱ्याला भारतरत्न? मेहबुबा मुफ्तींचा सवाल

भाजपानं जाहीरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केल्यानंतर...

Updated: Oct 17, 2019, 09:41 PM IST
'बलात्कार' हे युद्धाचं शस्र मानणाऱ्याला भारतरत्न? मेहबुबा मुफ्तींचा सवाल title=

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मुद्द्यावरुन पुन्हा वादंग सुरू झालाय. सावरकर नसते तर १८५७ च्या उठावाची इतिहास म्हणून नोंद झाली नसती, असं अमित शाह यांनी म्हटलंय. त्यावर मनमोहन सिंहांनीही प्रत्युत्तर दिलं. काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजपावर निशाणा साधलाय. 'बलात्कार हे युद्धाचे शस्र असल्याचं मानणाऱ्या माणसाला भारतरत्न दिला जातोय. जेव्हा गांधीजींसारख्या माणसाचा अपमान केला जातो आणि सावरकांसारख्या माणसांचा सन्मान केला जाऊ लागतो, तेव्हा देशानं आपली नैतिकता तपासून घ्यायला हवी' असं मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.  


मेहबुबा मुफ्ती यांचं ट्विट (सौ. ट्विटर)

भाजपानं जाहीरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय वादाला तोंड फुटलंय.  यावर विरोधकांकडून टीका सुरु झाल्यानंतर आता भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या वादात उतरले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर नसते तर १८५७ चा उठाव हा स्वातंत्र्यसंग्राम म्हणून गणला गेला नसता, असं शहा वाराणसीतल्या सभेत म्हणाले. 

तर काँग्रेसचा सावरकरांना विरोध नाही, त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला आहे, असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केलंय. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी सावरकरांच्या टपाल तिकिटाचं अनावरण केलं होतं, याचा दाखलाही यावेळी मनमोहन सिंग यांनी दिला.

यावर, काँग्रेसला फक्त स्वतःच्या कुटुंबीयांपुरतंच भारतरत्न मर्यादित ठेवायचं असल्याचा पलटवार भाजपाचे कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केलाय. 

सावरकरांना विरोध म्हणजे हिंदुत्ववाद्यांना विरोध, अशी काँग्रेस-डावे आणि त्यांच्या मित्रपक्षांची भूमिका आहे. भाजपाचं सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक बाबी बदलतायेत, त्यात आता नव्यानं इतिहास लिहिण्याची वेळ आल्याचं सूतोवाच अमित शाह यांनी केलंय. त्यामुळे सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा केवळ जाहीरनाम्यात राहतो की प्रत्यक्षात येतो? हे पाहावं लागेल.