HDFC Home Loan EMI: नुकत्याच पार पडलेल्या पतधोरण बैठकीमध्ये आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रेपो रेट स्थिर ठेवत बँक ग्राहकांची निराशा करण्यात आली. ज्यानंतर आता देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेनंही खातेधारकांना दणका दिला आहे.
HDFC बँकेनं काही काळासाठी कर्जावर असणाऱ्या MCLR दरात वाढ केली असून, ही वाढ 0.05 टक्क्यांनी करण्यात आली आहे. बँकेच्या या एका निर्णयामुळं ओवरनाईट पिरियडसाठी कर्जाची आकडेवारी 9.15 टक्क्यांवरून थेट 9.20 टक्क्यांवर पोहोचली आहे. उपलब्ध माहितीनुसार 7 डिसेंबरपासून हे नवे व्याजदर लागू झाले आहेत.
HDFC च्या या निर्णयानंतर सर्वसामान्य खातेधारकांवर थेट परिणाम होताना दिसणार असून, गृहकर्ज (Home Loan), वाहन कर्ज (Car Loan) आणि खासगी कर्ज अर्थात पर्सनल लोनच्या इएमआय हफ्त्यामध्ये वाढ होणार आहे. एमसीएलआर वाढल्यामुळं फ्लोटिंग लोनचे व्याजदर वाढत असून, त्यामुळं ग्राहकांना वाढीव ईएमआयचा फटका बसणार आहे. दरम्यान, इतर पिरियड लोन मात्र बँकेनं स्थिर ठेवले आहेत. येत्या काळात बँकेकडून कर्ज घेण्याच्या विचारात असणाऱ्यांनाही जास्त दरानं कर्ज घ्यावं लागणार आहे ही या निर्णयानंतरची वस्तूस्थिती.
कर्जदारांना दणका देण्याआधी बँकेनं PayZappवॉलेट यूजर्सचीही निराशा केली होती. 6 डिसेंबर रोजी बँकेनं एक नोटिफिकेशन जारी करत PayZappवॉलेटमध्ये क्रेडिट कार्ड (Credit Card) नं पैसे भरल्यास 2.5 टक्के GST देणं बंधनकारक असेल असं जाहीर केलं. या वॉलेटमध्ये डेबिट कार्डनं पैसे भरण्यावर मात्र कोणताही कर आकारला जाणार नाही. PayZapp हे एचडीएफसीचच एक मोबाईल वॉलेट अॅप असून, या अॅपच्या मदतीनं ऑनलाईन शॉपिंगपासून फ्लाईट बुकिंग, युटिलिटी बिल, मोबाईल रिचार्ज अशी कामं करता येतात.