पगार मागितला तर नोकरीवरुन काढलं, डॉक्टर पत्नीसह विकतोय चहा

पगार मागितला म्हणून डॉक्टरला कामावरुन काढल्याची घटना 

Updated: May 18, 2020, 02:34 PM IST
पगार मागितला तर नोकरीवरुन काढलं, डॉक्टर पत्नीसह विकतोय चहा  title=

करनाल : लॉकडाऊनमध्ये पोलीस, आरोग्य, सफाई कर्मचारी हेच आपले कोरोनो वॉरीअर्स बनून आपले रक्षण करताय. पण कामाच्या अनियमित वेळा, प्रचंड ताण यामुळे आपले योद्धेच अडचणीत असल्याचे दिसून येतयं. करनाल येथे असाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे. पगार मागितला म्हणून डॉक्टरला कामावरुन काढल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर डॉक्टरने आपल्या पत्नीसोबत चहा विकावा लागत आहे. गौरव वर्मा असे या डॉक्टरचे नाव आहे.

डॉक्टर गौरव वर्मा हे खासगी रुग्णालयात कामाला होते. रुग्णालयाने दोन महिन्याचा पगार दिला नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. पगार मागायला गेल्यावर त्यांची बदली करण्यात आली. याचा विरोध केल्याने मला नोकरीतून काढून टाकण्यात आल्याचे वर्मा यांनी सांगितले. 

आता रुग्णालयाच्याच कपड्यावर ते करनालच्या सेक्टर १३ मध्ये चहा बनवून लोकांना पाजत आहेत. या रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. कंपनीच्या मुख्य कार्यालयात बोलण झालं पण तिकडूनही काही दिलासा न मिळाल्याचे वर्मा सांगतात. त्यांची बदली गाझियाबादला करण्यात आली. वाद टोकाला गेल्यानंतर त्यांना नोकरीवरुन काढण्यात आले. त्यानंतर डॉ. वर्मा यांनी हरियाणा मुख्यमंत्री कार्यालयाकडे यासंदर्भात तक्रार केली. पण तिथूनही न्याय न मिळाल्याने रुग्णालयाच्या समोर चहा विकायला लागले. 

यासंदर्भात डॉ. वर्मा यांची तक्रार आली आहे. याची चौकशी सुरु असून सध्या यावर काही बोलू शकत नसल्याचे रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. लॉकडाऊनमुळे पगार द्यायला अडचण येत आहे. पण डॉ. गौरव यांचे म्हणणं पूर्णपणे चुकीचे असल्याचा खुलासा रुग्णालयाने केलाय. त्यांना अनेकदा बेकायदेशीर कृत्य करताना पाहीलं गेलं आहे. त्यासंदर्भात त्यांना तीन-चार नोटीस देखील पाठवण्यात आल्या आहेत. पण ते भेटायला आले नाहीत. जर त्यांना काही अडचण असेल तर हे प्रकरण भेटून सोडववता येईल असेही रुग्णालयाकडून सांगण्यात आले.