नवी दिल्ली : इस्रोच्या 'चांद्रयान २' या महत्त्वकांक्षी अभियानादरम्यान विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. 'हार्ड लँडिंग'मुळे त्याचा ७ सप्टेंबर रोजी ग्राऊंड स्टेशनशी संपर्क तुटला. त्यानंतर अद्यापही त्याची सद्यस्थिती, त्याचं ठिकाण शोधण्यास यश मिळालं नसल्याची माहिती अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा'ने (NASA) दिली आहे. 'विक्रम' लँडर ज्या भागात चंद्रावर उतरले त्या भागाचे काही फोटो आज पुन्हा एकदा 'नासा'कडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
'नासा'च्या लूनर रिकोनॉयसेंश ऑर्बिटर (Lunar Reconnaissance Orbiter) या स्पेसक्राफ्टने १७ सप्टेंबर रोजी लँडर ज्या भागात चंद्रावर उतरले त्या भागाची काही छायाचित्रे घेतली. 'नासा'ने हे फोटो ट्विट करत, प्रखर सूर्यप्रकाश आणि धूळ, तर काही भागात सावली असल्याने 'विक्रम'चा अचूक शोध घेणे कठीण झाले. त्यामुळे अद्यापही विक्रमचा ठावठिकाणा लागला नसल्याचं नासाने स्पष्ट केलं आहे.
Our @LRO_NASA mission imaged the targeted landing site of India’s Chandrayaan-2 lander, Vikram. The images were taken at dusk, and the team was not able to locate the lander. More images will be taken in October during a flyby in favorable lighting. More: https://t.co/1bMVGRKslp pic.twitter.com/kqTp3GkwuM
— NASA (@NASA) September 26, 2019
यानंतर, ऑक्टोबर महिन्यात या भागाचे पुन्हा एकदा फोटो घेतले जातील, असंही नासानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. ऑक्टोबरमध्ये, प्रकाशाची स्थिती अनुकूल असल्याने पुन्हा एकदा लँडरचं स्थान शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची शक्यता नासाने वर्तवली आहे.