नव्या वर्षांची खुशखबर; पेट्रोल होणार २५ रुपयांनी स्वस्त

२६ जानेवारीपासून लागू होणार निर्णय

Updated: Dec 29, 2021, 07:26 PM IST
नव्या वर्षांची खुशखबर; पेट्रोल होणार २५ रुपयांनी स्वस्त title=

झारखंड : पेट्रोल आणि डिझेलचे दर हे दिवसेंदिवस वाढत आहेत. या वाढत्या दरामुळे वाहन धारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशातच त्यांच्यासाठी एक दिलासा आणि आनंदाची देणारी बातमी समोर आली आहे. पेट्रोलचे दर चक्क २५ रुपयांनी स्वस्त होणार आहे.

झारखंडचे लोकप्रिय मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ही घोषणा केली आहे. सोरेन सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी ही घोषणा केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराचा परिणाम गरीब आणि मध्यमवर्गीयांवर होत आहे. त्यामुळे या समस्येतून त्यांची सुटका करण्यासाठी गरीब कामगार वर्गाला प्रति लिटर २५ रुपये दराने पेट्रोल देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या २६ जानेवारीपासून हा निर्णय झारखंड राज्यात लागू होणार आहे. मात्र, ही सवलत फक्त बाइक-स्कूटर असलेल्या बीपीएल कार्डधारकांसाठी असेल. अशा लोकांना एका महिन्यात जास्तीत जास्त १० लिटर पेट्रोल अनुदानित दरात देण्यात येणार आहे. 

ज्या बीपीएल कार्ड धारकांना पेट्रोल हवे असेल त्यांना पेट्रोल पंपावर जावे लागेल. तिथे त्यांना पेट्रोलची पूर्ण किंमत मोजावी लागणार आहे. त्यानंतर सरकार १० लिटर पेट्रोलसाठी २५० रुपये त्याच्या खात्यात ट्रान्सफर करेल. १० लिटरपेक्षा जास्त पेट्रोल घेतल्यास कार्डधारकाला बाजार दरानुसार किंमत मोजावी लागणार आहे.

झारखंडने सर्व राज्यांना मागे टाकले

एक्साईज ड्युटी आणि व्हॅटमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे या वर्षी पेट्रोलच्या किमती 100 रुपयांवर पोहोचल्या. तर, डिझेलचा दरही अनेक राज्यांमध्ये 80-90 रुपयांवर पोहोचला होता. लोकांचा वाढता रोष पाहून केंद्र सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि 10 रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती.

केंद्राच्या या घोषणेनंतर देशातील भाजपशासित राज्यांनी व्हॅटचे दर कमी करून किमती कमी करण्याची घोषणा केली होती. मात्र, बिगर भाजपशासित राज्ये या प्रकरणात अडकली होती. या सगळ्यामध्ये झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बीपीएल कार्डधारकांसाठी पेट्रोल दरात २५ रुपयांची कपात करण्याची घोषणा करून विजय मिळवला आहे.