गोधरा : कत्तलखान्यात कत्तल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर घेऊन निघालेल्या कथीत गायींना वाचविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुजरातमधील गोधरा येथे शनिवारी (१९ ऑगस्ट)घडली.
या हल्ल्याबाबत माहिती देताना गोधराचे पोलीस उपाधीक्षक वी के नाई म्हणाले, सुमारे १०० लोकांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला. जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी आश्रूधुराचे १८ राऊंड झाडावे लागले. पुढे बोलताना पोलीस उपाधिक्षक म्हणाले, गुरांना बंदीवान बनवून ठेवलेल्या ठिकाणी पोलीस पोहोचले तेव्हा, जमावाने दगडफेक करण्यास अचानक सुरूवात केली. अनपेक्षितरित्या हिंसक बनलेल्या जमावाला आटोक्यात आणण्यासाठी पोलीसांनी अश्रुधुराचा वापर केला.
कत्तल करण्यासाठी गायींची मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यात आली असून, विशिष्ट ठिकाणी गुरांना कोडून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी परिसराला घेराव घातला. कारवाई करून पोलिसांनी 49 गुरांना ताब्यात घेतल्याचेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन प्राथमिक स्वरूपात तक्रार दाखल केली आहे. गुजरातमध्ये गोहत्या करण्यावर बंदी असून, २१०७च्या कायद्यान्वये गोहत्या करणारास जन्मठेप किंवा पाच लाख रूपयांचा दंड किंवा दोन्ही स्वरूपाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.