Watch Video: जॅग्वॉरने लोकांना 25 फूटांवर उडवलं अन्... बाईकस्वाराच्या कॅमेऱ्यात कैद झाला 9 लोकांचा मृत्यू

Ahmedabad Iskon Bridge Accident Video: गुजरातमधील अहमदाबादमध्ये भरधाव कारने 9 जणांना चिरडले. या अपघातात तेरा जण जखमी झाले आहेत. आता या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. भरधाव जॅग्वॉरने धडक दिल्यानंतर लोक 25 ते 30 फुटांपर्यत हवेत उडाले होते.

आकाश नेटके | Updated: Jul 21, 2023, 09:33 AM IST
Watch Video: जॅग्वॉरने लोकांना 25 फूटांवर उडवलं अन्... बाईकस्वाराच्या कॅमेऱ्यात कैद झाला 9 लोकांचा मृत्यू title=

Ahmedabad Iskon Bridge Accident Video: गुजरातमधील (Gujarat News) अहमदाबादमध्ये बुधवारी रात्री एक भीषण रस्ते अपघात झाला होता. भरधाव जॅग्वॉर कारने (jaguar accident) डझनभर लोकांना चिरडल्यानंतर नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादमधील इस्कॉन पुलावर (ISKCON Bridge) रात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पुलावर झालेला अपघातात बघत असताना भरधाव जॅग्वॉरने लोकांना चिरडलं. अपघातावेळी जॅग्वॉरचा वेग 160 किमी प्रतितास असल्याचे म्हटलं जात आहे. या अपघातात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही (Gujarat Police) समावेश आहे. आता या अपघाताचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

अहमदाबादमध्ये झालेल्या या अपघातात 13 जण जखमी झाले आहेत. आता या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये पुलावर भरधाव वेगात आलेल्या जॅग्वॉरने अपघातस्थळी उभ्या असलेल्या गर्दीला धडक दिल्याचे दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरखेज-गांधीनगर महामार्गावरील इस्कॉन पुलावर दोन वाहनांची धडक झाल्यानंतर लोकांचा जमाव जमला होता. त्याचवेळी एका वेगवान जॅग्वॉरने जोरदार धडक दिली. त्यात नऊ जण जागीच ठार झाले तर 13 जण जखमी झाले. मृतांमध्ये बोटाड आणि सुरेंद्रनगर येथील लोकांचा समावेश असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

या अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीने सांगितले की, ज्या कारमुळे हा अपघात झाला ती भरधाव वेगाने येत होती. जखमी अल्तमास कुरेशी म्हणाले की, "थारचा पुलावर अपघात झाला होता. अपघातानंतर मी आणि माझे मित्र पुलावर गेलो. त्यानंतर मागून एक कार आली आणि तिने आम्हा सर्वांना जोरात धडकली. गाडीचा वेग खूप होता. ही गाडी गर्दीत घुसली."

अपघातावेळी जॅग्वॉरचा वेग 160 किमी प्रतितास इतका होता असे सांगितले जात आहे. पुलावरुन जाणाऱ्या एका बाईकस्वाराच्या कॅमेरामध्ये हा अपघाताचा थरार कैद झाला आहे. जॅग्वॉरने धडक दिल्यानंतर काही लोक हवेत फेकले गेले आणि 25-30 फूट लांब अंतरावर पडले. रस्त्यावर फक्त रक्ताचा सडा पसरला होता. अपघातानंतर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. यासोबतच त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

 

पहा व्हिडिओ..

दरम्यान, अपघातानंतर कारचालक तथ्य पटेल आणि त्याचे वडील प्रग्नेश पटेल तसेच कारमधील तीन मुलींसह एकूण सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी तथ्य पटेल यांच्यावर गुन्हा दाखल केल्यावर त्याच्या वडिलांची गुन्ह्याची पार्श्वभूमी समोर आली आहे. तथ्यच्या वडिलांवर सामूहिक अत्याचारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तथ्य पटेलचे वडील प्रज्ञेश पटेल हे बांधकाम व्यावसायिक आहेत. जॅग्वॉर कार त्याच्या एका सहकाऱ्याची होती. तथ्य पटेल हा अहमदाबादच्या गोटा भागातील रहिवासी आहे.