शिक्षण मंत्र्यांकडून आसारामची स्तुती

शिक्षण मंत्र्यांनी आसारामला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल

Updated: Jan 30, 2019, 04:05 PM IST
शिक्षण मंत्र्यांकडून आसारामची स्तुती title=

गांधीनगर : गुजरात सरकारमधील शिक्षण मंत्र्यांनी लिहिलेल्या एका पत्रामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. गुजरातचे शिक्षण मंत्री भूपेंद्र सिंह चूडासमा यांनी बलात्कारच्या आरोपाखाली दोषी असलेल्या आसाराम बापूला पत्र लिहून त्याच्या संस्थेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आसारामच्या योग वेदांत सेवा समितीद्वारा १४ फेब्रुवारी रोजी साजरा केल्या जाणाऱ्या मातृ-पितृ दिवसांची प्रशंसा केली आहे. भूपेंद्र सिंह चूडासमा यांनी लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून गुजरात सरकारसाठी हे वादाचे कारण ठरत आहे.

भूपेंद्र सिंह यांनी पत्रासाठी अधिकृत लेटरहेडचा वापर केला आहे. यावर त्यांचा फोटो आणि मंत्रालयाचे नाव देण्यात आले आहे. त्यांनी पत्रात 'तुमची संस्था १४ फेब्रुवारी हा दिवस मातृ-पितृ दिवस म्हणून साजरा करून प्रशंसनीय काम करत आहे. जे आई-वडिल आणि गुरूंची सेवा करतात ते चांगले नागरिक बनतील' असे त्यांनी पत्रात लिहिले आहे. 

'भारतीय संस्कृतीमध्ये एक सुत्र आहे. मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव, हे सर्वांना प्रेरित करत असते. तुमच्या संस्थेने एक नवीन सुरूवात करून दिली आहे. ज्याअंतर्गत 14 फेब्रुवारी 2019  हा दिवस मातृ-पितृ दिवस म्हणून साजरा केला जाईल. मी आशा करतो की याला मोठे यश मिळेल आणि तरूण-तरूणी आपल्या आई-वडिलांबद्दल आपली जबाबदारी समजून घेतील. या चांगल्या कामासाठी मी तुमच्या संस्थेचे अभिनंदन करतो.' असे पत्रात लिहिले आहे. या पत्रावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सिंह यांनी ही अतिशय लहान गोष्ट आहे याला मोठे बनवू नका, चांगले काम केलेल्यांचे कौतुक केले आहे असे त्यांनी सांगितले. 

गेल्या वर्षी जोधपूर न्यायालयाने उत्तप्रदेशातील शाहजहांपूर येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 77 वर्षीय आसारामला दोषी ठरविण्यात आले होते. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून सध्या आसाराम जोधपूर येथील सेंट्रल जेलमध्ये कारावास भोगत आहेत.