धक्कादायक! 60 लाखांसाठी CA नवऱ्यानं दिली पत्नीची सुपारी

सीए ललितने एकाला 2 लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नीला मारण्याचा कट रचला होता. 

Updated: Feb 7, 2021, 03:27 PM IST
धक्कादायक! 60 लाखांसाठी CA नवऱ्यानं दिली पत्नीची सुपारी title=

बनासकांठा: पैशांसाठी कोणाची नियत फिरेल याचा कधी नेम नाही. 5 रुपयांसाठी मुलीची हत्या केल्याची घटना ताजी असताना आता 60 लाखांसाठी पत्नीचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

एका चार्टर्ड अकाऊंटंटने स्वत: च्या पत्नीला क्रूरपणे जीवे मारण्याची सुपारी दिली. 60 लाख रुपयांचा मोह न आवरल्यानं त्यानं हे धक्कादायक कृत्य केलं. तर पत्नीची हत्या नसून तो एक अपघात झाला आहे. असा बनाव या आरोपी तरुणानं पोलिसांसमोर केला.

पत्नीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातून ही भयानक घटना समोर आली आहे. गुजरातच्या पोलिसांनी एका चार्टर्ड अकाउंटंटला अटक केली. ज्यात त्याच्या पत्नीची हत्या आणि कट रचल्याचा आरोप आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चार्टर्ड अकाउंटंटनं 60 लाखांचा वीमा मिळवण्यासाठी पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 26 डिसेंबर 2020 रोजी आरोपी चार्टर्ड अकाउंटंटने स्वत: पत्नीच्या मृत्यूची नोंद पोलीस ठाण्यात दिली होती. चार्टर्ड अकाऊंटंटने सांगितले की, त्यांची पत्नी दक्षबेन यांचा अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीला कारने धडक दिली.

मृत महिलेच्या नातेवाईकांना मात्र सीएच्या बोलण्यावर विश्वास बसेना. त्यांनी पोलिसांना या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. पोलिसांनी या प्रकऱणाच्या मूळापर्यंत जाऊन महिलेचा अपघात झाला की घातपात करण्यात आला याचा शोध घेतला आणि धक्कादायक सत्य समोर आलं. 

सीए ललितने एकाला 2 लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नीला मारण्याचा कट रचला होता. तर आरोपी सीएनं विमा कंपनीकडे 60 लाख रुपयांचा क्लेम केला होता. तीन महिने आधीच हा विम्याचा क्लेम केला होता. 

26 डिसेंबर रोजी सकाळी ललित आपल्या पत्नीसमवेत मंदिरात जाण्यासाठी घराबाहेर पडला. ललितने आरोपी चालकाला अपघात कसा घडवून आणायचा याबाबत प्लॅन सांगितला. या प्लॅननुसार पती आपल्या पत्नीला त्या ठिकाणी घेऊन आला. पत्नीला कारने धडक देण्याआधी तिथून आरोपी स्वत:चा जीव वाचवून निघून गेला. भरधाव वेगवान वाहनाने महिलेला धडक दिली आणि तिचा मृत्यू झाला.