गुजरातमध्ये शिवसेनेच्या गोल्डन मॅनचे झाले असे काही.....

कुंजल पटेल यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. पण, त्यांना दारून पराभवाचा सामना करावा लागला. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 18, 2017, 04:11 PM IST
गुजरातमध्ये शिवसेनेच्या गोल्डन मॅनचे झाले असे काही..... title=

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीत अहमदाबाद जिल्ह्यातील दारियापुर -51 मतदारसंघ खूप चर्चेत राहिला.  शिवसेनेने दिलेला उमेदवार हे चर्चेचे कारण होते. कुंजल पटेल यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. पण, त्यांना दारून पराभवाचा सामना करावा लागला. गोल्डन मॅन अशी ओळख असलेल्या या उमेदवाराला अपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही.

मतदार संघातील सोनेरी उमेदवार म्हणून या कुंजल पटेल यांच्याबाबत सर्वांनाच कुतूहल होते. आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातही पटेल यांनी 45 तोळे सोन्याच्या दागिण्यांबाबत माहिती दिली होती. कुंजल यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, त्यांच्या घरी 115 तोळे सोने आहे. तसेच, ते 50 तोळे सोन्याचे दागिणे वापरतात. या दागिण्यांचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख नसल्याबाबत विचारले असता सासऱ्यांकडून भेट म्हणून मिळालेल्या दागिण्यांचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. 

अनामत रक्कमही वाचली नाही

दिरुयापुर-51 मतदारसंघातून पटेल यांची लढत कॉंग्रेसच्या शेख गयासुद्दीन हबीबुद्दीन यांच्यासोबत झाली. हबीबुद्दीन यांनी 63712 मते मिळवली तर, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपला 57525 मते मिळाली. तर गोल्डन मॅन कुंजल पटेल यांना केवळ 1393 मतांवर समाधान मानावे लागले.

दागिणे घालून केला होता प्रचार

शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढविणाऱ्या कुंजल पटेल यांनी प्रचार करताना अतिप्रमाणात दागिणे वापरले होते. प्रचारला घराबाहेर पडताना ते दागिणे घालूनच बाहेर पडत असत. हातात मोठी मोठी ब्रेसलेट, तर गळ्यात मोठमोठ्या चैन. पटेल यांन निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वत:ची संपत्ती 49 लाख इतकी असल्याचे म्हटले आहे. तसेच, आपल्याकडे रोख 24 हजार आणि 45 तोळे सोने आणि दोन कार असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसची मोठी मुसांडी

दरम्यान, ताज्या वृत्तानुसार भाजप सध्या 98 जागांवर आघाडीवर आहे. तर, कॉंग्रेस 81 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्ष 3 जागांवर अगाडीवर आहेत.  त्यामुळे गुजरातमधले राजकीय चित्र प्रचंड बदलताना दिसत आहे. गुजरातमध्ये भाजपचा पराभव झाला किंवा अल्पमतात सत्ता आली तरी, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी तो प्रचंड मोठा धक्का असणार आहे. दरम्यान, निवडणुकीचे कल क्षणाक्षणाला बदलत आहेत अद्याप कोणतेही चित्र स्पष्ट झाले नाही.

कडेकोट पोलीस बंदोबस्तात 33 जिल्ह्यांमध्ये मतमोजणीला सुरूवात झाली आहे. ही मतमोजणी एकूण 37 केंद्रांवर सुरू आहे. गुजरातमध्ये झालेल्या 182 जागांसाठी 68.41 टक्के मतदान झाले होते. उत्तर गुजरातमध्ये 32 जागा आहेत. दक्षिण गुजरातमध्ये 35, सौराष्ट्र 54 आणि मध्य गुजरातमध्ये 91 जागा आहेत.