पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर

आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन सत्ताधारी आणि विरोधातील सर्वच राजकीय पक्षांनी आपला मोर्चा गुजरातकडे वळवला आहे. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आगोदरच गुजरात दौऱ्यावर असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदीही दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी गुजरातला रवाना झाले आहेत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 7, 2017, 11:05 AM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर title=

अहमदाबाद : आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन सत्ताधारी आणि विरोधातील सर्वच राजकीय पक्षांनी आपला मोर्चा गुजरातकडे वळवला आहे. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आगोदरच गुजरात दौऱ्यावर असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदीही दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी गुजरातला रवाना झाले आहेत.

पंतप्रधान मोदी सात आणि आठ ऑक्टोबर असे दोन दिवस गुजरात दौऱ्यावर असतील. यावेळी पंतप्रधान विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच आपल्या जन्मगावी वडनगर इथं जाणार आहेत. दरम्यान, द्वारकाधीश मंदिरातील मूर्तीदर्शनानंतर मोदींच्या या दौ-याची सुरुवात झाली. या दौऱ्यात मोदी चार विविध रस्ते प्रकल्पांचं भूमीपूजन करतील. तसेच, द्वारका येथील बेत आणि ओखा दरम्यानचा पूल आणि विविध प्रकल्पांचं भूमीपूजन मोदींच्या हस्ते होईल. यावेळी मोदी जवळपास 5800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं गिफ्ट गुजरातला देण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
भाजपने ताकद लावली

दरम्यान, केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपची गुजरातमध्येही सत्ता आहे. गेली काही वर्षे सत्तेत असलेला भाजप गुजरातची सत्ता कायम राखण्याच्या विचारात आहे. तर, भाजपच्या चौखूर उधळलेल्या वारूला गुजरातमधूनच धक्का देण्याच्या प्रयत्नात कॉंग्रेस आहे. राज्यसभा निवडणुकीवेळी अहमद पटेल यांच्या रूपाने कॉंग्रेसच्या या प्रयत्नाला काहीसे यशही आले. दरम्यान, जनतेच्या मनात भाजप सरकारबद्धल द्विधा आवस्था निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने सावध पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दीड महिन्यात गुजरातमध्ये केलेला हा तीसरा दौरा आहे. या आधी मोदींनी १३-१४ सप्टेबरला बुलेट ट्रेन प्रकल्पाचे उद्गाटन करताना जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासोबत गुजरातमध्ये हजेरी लावली होती. तर, १६ आणि १७ तारखेलाही ते गुजरात दौऱ्यावर होते. या महिन्यातला त्यांचा हा पहिलाच गुजरात दौरा आहे.

दरम्यान, कॉंग्रेसनेही गुजरातमध्ये ताकद लावली आहे. त्यासाठी राहुल गांधींनी गुजरात दौऱ्यावर राज्यातील विवीध मंदिरांनी भेटी देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे कॉंग्रेसनेही मवाळ हिंदूत्वचा मुद्दा स्विकारला आहे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.  या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी राहुल गांधी यांच्या दौऱ्याबाबत काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. मोदींनी जर राहुल गांधी यांच्या दौऱ्यावर भाष्य केले तर, आगामी गुजरात विधानसभा निवडणुक प्रचाराचे रणशिंग आजच फुंकले जाण्याची शक्यता आहे.